LATURMarathwada

नांदेड-बिदररोडचे २५ जानेवारीपर्यंत अतिक्रमण न काढल्यास, २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन!

उदगीर (तालुका प्रतिनिधी) – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयपर्यंतचे अतिक्रमण २५ जानेवारीपर्यंत काढले नाही तर, येत्या २६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करू, असा इशारा आंदोलनकर्ते पत्रकारांनी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला असताना, प्रशासन मात्र अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंतच्या रोड व नालीचे बांधकाम चालू आहे. या रोड व नालीचे बांधकाम अतिक्रमण न काढताच चालू असून, नियमाप्रमाणे १०० फुटाच्या रोडऐवजी कमी जास्त प्रमाणात रोडचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. याबाबत आंदोलनकर्ते पत्रकारांनी अनेकवेळा संबंधित अधिकार्‍यांना लेखी निवेदन देऊन देखील, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात पत्रकारांचे १४० दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आंदोलनकर्ते पत्रकारांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना लेखी पत्र देऊन कळविलेले आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ पर्यंत अतिक्रमणाच्या संदर्भात प्रशासनाने निर्णय नाही घेतल्यास, लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.


यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लवकरच अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन आंदोलनकर्ते पत्रकारांना भेटीच्यावेळी दिले आहे. हा रोड महत्त्वाचा असून, उदगीरच्या विकासात भर पडणारा आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहन धारकाची होणारी गैरसोय दूर होणार आहे. याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!