वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेसाठी ११ नावांची घोषणा; पहिल्याच यादीत सिंदखेडराजातून वंजारी समाजाच्या सविता मुंढेंना उमेदवारी जाहीर
- रावेरमधून लेवा पाटील समाजाच्या तृतीयपंथीय नेत्या शमिमा पाटील यांना उमेदवारी घोषित, शेवगावातून प्रा. किसन चव्हाण यांना संधी
– तिसर्या आघाडीत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांची नकारात्मक भूमिका!
मुंबई (बाळू वानखेडे) – विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्थापित राजकीय पक्षांत अद्याप चर्चेचे गुर्हाळच चालू असताना, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली पहिली यादी जाहीर करून, राजकीय पक्षांना जोरदार चपराक दिली आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ११ उमेदवारांची घोषणा केली असून, पहिल्याच यादीत सिंदखेडराजा मतदारसंघातून त्यांनी वंजारी समाजाच्या नेत्या सविताताई मुंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, रावेरमधून लेवा पाटील समाजाच्या तृतीय पंथीय नेत्या शमिमा पाटील यांच्यासह इतर मागासवर्गीय (ओबीसी)सह सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची भूमिका आंबेडकरांनी घेतलेली दिसते आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पूर्व येथून भाजपचे अतुल सावे, रावेरमधून काँग्रेसचे शिरीष चौधरी, नांदेड दक्षिण येथून काँग्रेसचे मोहन हंबर्डे, सिंदखेडराजा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार असलेल्या जागांवर आंबेडकरांनी उमेदवार उभे केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. ‘वंचित’ने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली. शमिभा या ट्रान्सजेंडर (तृतीय पंथीय) असून, लेव्हा पाटील आहेत. तसेच, या यादीद्वारे जातीय समीकरणही साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षाने या यादीच्या माध्यमातून लेव्हा पाटील, वंजारी, बुद्धिस्ट, लोहार (ओबीसी) धीवर, मुस्लीम, लिंगायत, मराठा, पारधी (आदिवासी) व वडार समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील नीलेश विश्वकर्मा हे वंचित आघाडीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
https://x.com/i/broadcasts/1BRKjwjEDOgGw
—-
विधानसभा निवडणूक उमेदवार यादी
रावेर – शमिभा पाटील (तृतीयपंथी)
सिंदखेडराजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – नीलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे
साकोली – डॉ. अविनाश नन्हे
नांदेड दक्षिण – फारुक अहमद
लोहा – शिवा नारंगळे
औरंगाबाद पूर्व – विकास दांडगे
शेवगाव – प्रा. किसन चव्हाण
खानापूर – संग्राम माने
———
याआधी, लोकसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीने मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत यश मिळाले नव्हते. त्यात अनेकांचे डिपॉझीट जप्त झाले होते. दुसरीकडे, माजी खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू या तीन प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती ही नवी आघाडी स्थापन केली आहे. दोन दिवसांआधी पुण्यात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांची बैठकदेखील पार पडली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही तिसर्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे राजू शेट्टी म्हणाले होते. त्यावर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राजू शेट्टीसोबत जी चर्चा झाली. ती तुमच्यासमोर मांडतो. वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवाना पार्टीदेखील तिथून लढते. वामनराव चटप दुसर्या जागेवरुन लढणार असतील तर आम्ही विचार करु शकतो. आपण रिजनल पार्टीसंदर्भात बोललो तर ठिक आहे. लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. बच्चू कडूंबरोबर आमचे जमू शकत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रकाश शेंडगे यांच्याकडून आम्हाला अजून तसा कोणाचा प्रस्ताव आलेला नाही. वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी संघटना जिल्हा जिल्ह्यातील कमिटी उमेदवार ठरवणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, ही जी मागणी आहे. त्यासंदर्भात महाविकास आघाडीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. ओबीसीला उमेदवारी मिळालेली नाही, असे ओबीसींना वाटत आहे. निजामशाही मराठ्यांना त्यांनी उमेदवारी दिली. आरक्षणवादी उमेदवारांना आम्ही प्रतिनिधीत्व देतोय, असे आंबेडकरांनी याप्रसंगी सांगितले.
राष्ट्रपती राजवट राज्यात लावली जाईल अशी चर्चा होती. २६ किंवा २९ नोव्हेंबर अशा दोन तारखा आहेत. आताचे सभागृह या दोन तारखांच्या प्रमाणे सभागृह डिझॉल्व्ह होते. आमदारकीचा निश्चित कार्यकाळ आहे. त्यात सभागृह सुरु आहे दाखवायचे आहे तर एखाद्याला शपथविधी दाखवावा लागेल. माझ्या अंदाजाने जे वारे वाहत होते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी ही शक्यता नाही. १२ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल, असे गृहित धरुन चाललो आहे. १५ नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावे लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावे लागेल.
– अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
———–