‘फेक पत्रा’चा खोडसाळपणा अंगाशी येणार?; मनोज कायंदेंना सहानुभूतीची लाट!
- ते फेक पाठिंबापत्र कुणी व्हायरल केले? संबंधितांचा टायमिंग चुकल्याची चर्चा, आणि गेमही उलटला?
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार मनोज देवानंद कायंदे यांच्याबाबत एकीकडे मतदारसंघात जोरदार लाट निर्माण झालेली असताना, दुसरीकडे त्यांच्या राजकीय विरोधकांनी एक फेक पाठिंबापत्र व्हायरल करून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिंदे गटाचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे पत्र व्हायरल होऊन काही मिनिटे होत नाही तोच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी वरिष्ठ पातळीवर फोनाफोनी करून या व्हायरल पत्राची खातरजमा केली, व हे पत्र बोगस असल्याचे स्पष्ट होताच, तातडीने खुलासा करून मनोज कायंदे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, राष्ट्रवादीने कुणालाही पाठिंबा दिला नाही, हे लगेचच लोकांच्या निदर्शनास आणून दिले. या व्हायरल पत्रामुळे मनोज कायंदे यांच्या सहानुभूतीत मात्र कमालीची वाढ झाली. अनेक गावेच्यागावे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून, ज्या कुणी विरोधकाने हा खोडसाळपणा केला, त्याचे मात्र पाय आणखीच खोलात गेले आहेत. हे फेक पत्र व्हायरल करण्याचा टायमिंग चुकला आणि गेम उलटला, अशी खमंग चर्चा सद्या मतदारसंघात सुरू आहे.
सिंदखेडराजा मतदारसंघात कधी नव्हे ती यंदा विधानसभेची निवडणूक अगदी काट्याची टक्कर होत आहे. स्व. देवानंद कायंदे यांच्यासारख्या सृजनशील नेतृत्वाचे चिरंजीव व स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या कामाचा ठसा उमटवलेले मनोज कायंदे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघात संधी मिळाली आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. राजेंद्र शिंगणे व शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर हे दिग्गज उमेदवार उभे आहेत. मतदारसंघातील गावांत सद्या संमिश्र वातावरण जाणवत असताना, कालच्या फेक पाठिंबापत्राच्या प्रकारानंतर मात्र अनेक गावे मनोज कायंदेच्या पाठीशी एकवटल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील वारे फिरल्यामुळे इतरही गावे परिवर्तनाच्या दिशेने विचार करत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यामुळे एक प्रकारे ज्याने हे फेक पत्र व्हायरल करण्याची घोडचूक केली, त्याच्यामुळे प्रस्थापित उमेदवारांना जोरदार फटका बसण्याची शक्यता असून, या मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आज दिवसभर गावोगावी वेगवेगळ्या चर्चा ऐकायला येत होत्या. दरम्यान, उद्या, दि.२० नोव्हेंबररोजी मतदान होत असून, त्यात मतदार आपला काय कौल देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
———-
व्हायरल पत्राने उडविली खळबळ; तर मनोज कायंदे मैदानात कायम असल्याचा पक्षाचा निर्वाळा!