– शेतकरी नेते व डोणगाव अर्बनचे संस्थापक ऋषांक चव्हाण यांनी व्हिडिओ जारी करत केले कळकळीचे आवाहन
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – विकास न करताही निवडणून येऊ शकतो, आणि बाहेरून आलेला उमेदवार पैशाच्या जोरावर मतं विकत घेऊन निवडून येऊ शकतो, हा ट्रेडमार्क मेहकर-लोणार मतदारसंघाच्या बाबतीत सेट हेऊ द्यायचा नसेल तर आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील, परंतु विकासाचे व्हिजन आणि धमक असलेल्या तरूणांना विधानसभेत पाठवा, माझी पत्नी डॉ. ऋतुजा चव्हाण यांना एक संधी विचारपूर्वक द्या, असे कळकळीचे आवाहन शेतकरी नेते व डोणगाव अर्बनचे संस्थापक ऋषांक चव्हाण यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी आज (दि.१८) दुपारी त्यांनी एक व्हिडिओ जारी करून मतदारांसमोर आपली भूमिका सविस्तरपणे मांडली असून, निवडणूक काळात झालेल्या त्रासाबद्दलही वाच्यता केली आहे.
शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांच्या पत्नी व शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ऋषांक चव्हाण म्हणाले, की गेली चार वर्षे आपण शेतकरी चळवळीत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. चळवळीत काम करत असताना विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याचा विचार मनात आला म्हणून लोकांची मते जाणून घेण्यासाठी आम्ही मतदारसंघात गेलो. लोकांनी अनुकूल मते दिली. अनेकांची इच्छा होती की परिवर्तन घडविण्यासाठी उभे रहा. त्यानुसार, निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलिंडर या चिन्हावर उभे राहिलो आहोत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून आमच्याबाबत विविध अफवा पसरविल्या जात आहेत. आम्ही माघार घेऊ, पैसे घेऊन शांत बसतील, यांना मतेच पडणार नाही, अशा प्रकारच्या अफवा विरोधक पसरवत राहिले आणि आम्ही मोठ्या जोमाने प्रचार करत राहिलो. गावोगावी गेलो, लोकांना भेटलो, त्यांचे आशीर्वाद मागितले. कालपर्यंत या सर्व अफवा सुरू होत्या. अफवा पसरवूनही काहीच फरक पडत नाही, हे पाहून त्यांनी आमच्या बाबतीत साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरली. आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला, आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला, आमचे जवळचे सहकारी आम्हाला सोडून गेले, तरीही आम्ही डगमगलो नाही. आजपर्यंत आम्ही मैदानात कायम राहिलो असून, आजपासून ही निवडणूक मात्र मतदार मायबापांच्या हातात जात आहे.
आमची विनंती एकच आहे, की सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणी राजकारणात यावे? की धनाढ्य व प्रस्थापितांनीच राजकारण व सत्ताकारण करावे? याचा पैâसला आता मायबाप जनतेला घ्यायचा आहे. २० तारखेला मतदान करताना, विद्यमान आमदाराला मत दिले तर विकासकामे न करताही निवडून येता येते, हा संदेश सर्वत्र जाईल. तर बाहेरच्या लादलेल्या उमेदवाराला मत दिले तर बाहेरून कुणीही इथं येऊन पैशाच्या जोरावर मते विकत घेऊन निवडून येऊ शकतो, असा संदेश सगळीकडे जाईल. तर आम्हाला निवडून दिले तर सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणीही निवडणुकीत उभे राहू शकतात. मतदारसंघाच्या विकासासाठी तेही विजयी होऊ शकतात, व मतदारसंघाचा चेहरामोहरा ते बदलू शकतात, असा एक चांगला संदेश सर्वत्र जाईल. तेव्हा, मायबाप मतदारांनी आता काय योग्य ते ठरवायचे आहे. आपले एक मत, आणि एक निर्णय या मतदारसंघाचे भवितव्य बदलविणारा ठरणार आहे. तेव्हा काळजीपूर्वक मतदान करून माझ्या पत्नी डॉ. ऋतुजा ऋषाक चव्हाण यांनाच विधानसभेत पाठवा, असे कळकळीचे आवाहनही शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी या व्हिडिओद्वारे मेहकर-लोणार मतदारसंघातील जनतेला केलेले आहे.