प्रचारतोफा थंडावल्या! आता गुप्त भेटीगाठींवर जोर!
- बुधवारी (दि.२०) २८८ सदस्यीय विधानसभेसाठी मतदान
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मागील चार आठवड्यांपासून राज्यभर सुरू असणारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी ६ वाजता खाली बसला. आता राजकीय पक्षांकडून भेटीगाठी व गुप्त बैठकांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू होणार आहे. यात मतदारांना पैसे व भेटवस्तू वाटण्याचेही प्रकार होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे. दरम्यान, आता प्रचारसभा, रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली आदींचा दणदणाट शांत झाला असून, अवघ्या महाराष्ट्राला बुधवारी होणार्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास म्हणजेच, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रचार करण्याची संधी उमेदवारांना होती. या प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झंझावती सभा झाल्या. यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटलांनी ६१ सभा गाजवल्या. प्रचार करणार्या नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. त्यांनी राज्य पिंजून काढत संपूर्ण राज्यभरात ६४ सभा घेतल्या. आज सोमवार संध्याकाळपासून छुप्या पद्धतीने करण्यात येणार्या प्रचारास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. या प्रचारात उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतील. दरम्यान, महिनाभरापासून राज्यात सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी, गावभेटींसह राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता.
२८८ सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात राज्यातील ४ कोटी ९५ लाख पुरुष व ४ कोटी ६४ लाख महिला मतदारांसह एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. हे मतदार ४१३६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदान यंत्रात बंद करतील. ‘द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या माहितीनुसार, राज्यातील ४१३६ उमेदवारांपैकी ४९० उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे, ४९६ उमेदवार प्रादेशिक पक्षांचे, १०३६ उमेदवार मान्यता नसलेल्या पक्षांचे, तर २०८७ उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत.