विधानसभेसाठी राज्यात उद्या मतदान; साडेचार हजार उमेदवारांचा ठरणार फैसला!
- शनिवारी (दि.२३) तारखेला मतमोजणी, महाराष्ट्राचा कौल कळणार?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यात उद्या (दि.२०) होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्यक साहित्यासह मतदान कर्मचारी आज आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. मतदान कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. मतदान कर्मचार्यांच्या वाहतुकीसाठी एसटी बसेस तसेच खाजगी गाड्यांची सोय करण्यात आलेली होती. उद्या ३६३ महिला उमेदवारांसह एकूण चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे.
राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी उद्या (दि.२०) मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी झंझावाती प्रचारसभा घेतल्या. गेले पंधरा दिवस निवडणूक प्रचारानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून, राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. तसंच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याच्या प्रचाराची तसंच विविध राज्यात दि. २० नोव्हेंबरला होणार्या विधानसभेच्या १५ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता काल झाली.