– अन्य एका अपघातात काळीपिवळीला दुचाकीची धडक, तिघे गंभीर जखमी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत वर्दडा फाट्यावर चिखली आगाराची बस ही बंद पडलेली असताना त्या बसवर भरधाव असलेली दुचाकी ही पाठीमागून येऊन धडकली, त्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंधारात ही बस दिसून न आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर अन्य एका दुर्घटनेत, लव्हाळा ते साखरखेर्डा रोडवर काळी पिवळीला मोटारसायकलस्वारांनी धडक दिल्याने तिघे जखमी झाले आहेत.
लव्हाळा चौकीपासून एक किलोमीटर अंतरावर वर्दडा फाटा असून, तेथे चिखली आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८८१६ ही बस आज, दि. ८ ऑक्टोबररोजी दुपारी बंद पडली होती. त्या बसचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रात्री साडेसात वाजता लव्हाळा येथून गोपाल पंढरी सुरडकर (वय २१) रा. बेराळा, धनंजय परमेर्श्वर ढेंग (वय २५) रा. वाघापूर, आणि सुनील सुभाष सोनुने, रा. चिखली (खडक पुरा) चिखलीकडे चालले होते. त्यांची मोटारसायकल उभ्या असलेल्या एसटी बसवर येऊन धडकली. मोटारसायकलचा वेग एवढा होता की, तिघेही जागीच ठार झाले. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना कळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
तर आज रात्री ८ वाजता साखरखेर्डा येथील तीन व्यापारी चिखलीकडे मोटारसायकलवर जात असताना चिखली येथून साखरखेर्डा येथे येत असलेल्या काळीपिवळी या प्रवासी वाहनांवर जाऊन धडकले. यात दोघे गंभीर जखमी असून, एकाला किरकोळ मार लागला आहे. वृत्त लिहीपर्यंत जखमींची नावे मिळून आली नाही.
दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या एसटी बसच्या चालकाने इंडिकेटर किंवा सुरक्षेचे उपाय न योजल्यामुळे दुचाकीवरील तरूणांना अंधारामध्ये समोर एसटी बस उभी असल्याचे समजून आले नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यामुळे या अपघाताला एसटी बसचे वाहक व चालक जबाबदार आहेत, असा आरोपही घटनास्थळावरून करण्यात येत होता. चालक व वाहकांनी पुरेशी काळजी घेतली असती, तर या तीन तरूणांचे जीव वाचले असते, अशीही घटनास्थळी चर्चा होती.