मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट निर्माण झालेली असल्याने उद्या (दि.२०) त्यांच्या पदरात मतांचे दान मतदार टाकणार आहे, की पहिले पाढे पंचावन्न असेच घडणार आहे? याबाबत सद्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच सोयाबीन व कापसाचा भाव, शेतकर्यांना अद्यापही न मिळालेला पीकविमा, मतदारसंघाचा रखडलेला विकास या भोवती ही निवडणूक फिरली असून, डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासह ठाकरे गटाच्या उमेदवाराने याप्रश्नी जोरदार आवाज उठविल्याने सत्ताधारी पक्षासमोर चांगल्याच अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू तथा शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती सभा झाल्यात. या सभांतून आरक्षण, शेतकरी प्रश्न, स्थानिक विकास या मुद्द्यांवर प्रखडपणे भाष्य करण्यात आले. तर स्थानिक उमेदवारांनीही शेतकरी पीकविमा, कापूस व सोयाबीनचे भाव, शेतकर्यांची पिळवणूक, मतदारसंघाचा रखडलेला विकास आदी मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला चांगलेच अडचणीत आणले. त्यामुळे मतदारसंघात गावोगावी जाऊन जनतेचे आशीर्वाद घेतलेल्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासारख्या उच्चशिक्षीत व स्थानिक शेतकरी नेतृत्वाला मतदार संधी देणार की पहिले पाढे पंचावन्न करणार? याबाबत सद्या राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. काल शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी एक व्हिडिओ जारी करून, मतदारांना सदसदविवेकबुद्धीने निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. बाहेरील उमेदवार निवडला तरी चुकीचा संदेश राज्यात जाईल, मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवणारा उमेदवार निवडला तरीही चुकीचा संदेश राज्यात जाईल. त्याउलट तरूणाईला संधी दिली तर हे तरूणरक्त मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढेल. शिवाय, या नव्या तरूण नेतृत्वाला पाहून सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणी राजकारणात येण्याचे धाडसही करतील. ऋषांक चव्हाण यांची ही भूमिका मतदारसंघातील सर्वांना पटलेली आहे. त्यामुळे उद्या (दि.२०) मतदार काय कौल देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.