Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण होणार?; बहुतांश एक्झिट पोल संदिग्ध!

- 'इलेक्ट्रोल एज'नुसार १५५ जागांसह महाआघाडी सत्तेवर येणार; 'चाणक्य'च्या पोलनुसार महायुतीला १६० जागा मिळणार!

मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडताच, विविध दूरचित्रवाणी वाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले असून, या सर्व पोल्सचे अंदाज बघितले असता, राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाणक्य संस्थेच्या अंदाजानुसार महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील तर इलेक्ट्रोल एजनुसार महाआघाडीला १५५ जागा तर महायुतीला ११९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. विदर्भात महाआघाडीला सर्वाधिक ३७ व मराठवाड्यात २६ जागा मिळतील, असेही या अंदाजात नमूद आहे. दरम्यान, हे सर्व एक्झिट पोल बाहेर येताच भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली, व त्यांच्याशी गुप्तगू केली. या भेटीचा तपशील उघड होऊ शकला नाही.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आज काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. येत्या २३ नोव्हेंबररोजी निकाल लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्य लढत होणार आहे. त्याच वेळी राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यातील जनतेचा कल काय असू शकतो याचे एक्झिट पोल रात्री सार्वत्रिक झाले आहेत. या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई दिसत आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, महायुतीला १२९ ते १५९ आणि महाविकास आघाडीला १२४ ते १५४ जागा मिळतील.

झी न्यूज-सीपीएलच्या पोलनुसार महाविकास आघाडीला १२४ ते १५६ जागा मिळतील. तर महायुतीला १२९ ते १५९ जागा मिळतील. तसेच इतरांना ० ते १० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकशाही-रूद्रच्या पोलनुसार महायुतीला १२८ ते १४२ जागा मिळतील आणि १२५ ते १४० जागा महाविकास आघाडीला मिळतील. तर इतरांना १८ ते २३ जागा मिळतील. रिपब्लिकच्या पोलनुसार, महायुतीला १३७ ते १५७ जागा, तर मविआला १२६ ते १४६ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पोल ऑफ पोलने वर्तवला आहे. राज्यात महायुतीला १५२ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला १२६ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना १० जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यातला विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय अटीतटीचा असणार आहे. महायुतीला निवडणुकीत १३७-१५७ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना २ ते ८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडी १३० ते १३८ जागा जिंकेल असा अंदाज वर्तविला आहे. तर महायुती १५२ ते १६० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविला आहे. इतर ६ ते ८ जागा जिंकेल, असा दावा केला आहे. मॅट्रीक्स या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार, भाजप २७ ते ५०, शिंदे गट ४५ ते ४७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १७ ते २६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस ३९ ते ४७, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ३५ ते ४३, ठाकरे गटाला २१ ते ३९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर इतर ८ ते १० जागा निवडून येतील, असे अंदाज वर्तविला आहे. तर सर्वात विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या इलेक्ट्रोल एज या संस्थेने राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यात महाविकास आघाडीला १५५ तर महायुतीला ११९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, भाजप (७८), काँग्रेस (६०), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (४६), शिवसेना ठाकरे ४४, शिवसेना शिंदे – २६, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार १४, इतर १२ अशा जागा येतील, असा अंदाज इलेक्ट्रोल एज या संस्थेच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. हे सर्व एक्झिट पोल पाहाता, राज्यात त्रिशंकु विधानसभेचे संकेत प्राप्त होत आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!