Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा कौल!

- विद्यमान आमदारांसाठी धोक्याची घंटा; जयश्रीताई शेळके यांनाही निवडणूक अवघड

– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे धक्कादायक निष्कर्ष; तुपकरांची जोरदार लाट!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत तब्बल अडिच लाख मते घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून कौल प्राप्त झालेला आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने या मतदारसंघात सर्वेक्षण घेण्यात आले असता, तुपकर यांना ४३.८५ टक्के लोकांनी आपली पसंती दिली तर, आ. संजय गायकवाड यांना २३.३८ टक्के लोकांची पसंती मिळाली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांना २१.०२ तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांना अवघ्या ५.५५ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शविली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुलढाण्यातून आपला संभाव्य उमेदवार बदलावा लागण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील आघाडीचे डिजिटल मीडिया असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने ‘ट्रॉपोल्स’च्या सहाय्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीविषयी अंदाज जाणून घेतला. या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात प्राथमिक तत्वावर ३,०९७ लोकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यातील १,३५८ लोकांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आपली पसंती दर्शविली. तर ७८६ लोकांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना दुसर्‍या क्रमांकाची पसंती दर्शविली. काँग्रेसच्या विधानसभेसाठी इच्छुक नेत्या जयश्रीताई शेळके यांना ६५१ लोकांनी पसंती दर्शविली तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संभाव्य उमेदवार जालिंधर बुधवत यांना अवघ्या १७२ लोकांनी आपली पसंती दर्शविली. माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि संभाव्य उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना फक्त ६५ लोकांनी आपली पसंती दर्शविली आहे. तर माजी आमदार तथा भाजपचे नेते विजयराज शिंदे यांना अवघ्या २५ लोकांनी पसंती दर्शविली असून, लोकसभेला दणकून पराभव झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षात गेलेल्या संदीप शेळके यांना २४ लोकांनी आपली पसंती दर्शविली आहे; तर माजी आमदार तथा भाजपचे नेते धृपतराव सावळे यांना फक्त १६ लोकांनी पसंती दर्शविली आहे. एकूणच रविकांत तुपकर (४३.८५ टक्के), संजय गायकवाड (२५.३८ टक्के), जयश्री शेळके (२१.०२ टक्के) आणि जालिंधर बुधवत ५.५५ टक्के इतकी लोकांची पसंती दिसून येते आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी; या मतदारसंघातील मतदार शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानतो. त्यामुळेच विजयराज शिंदे यांच्यासारखा अल्पसंख्यांक समाजातील नेता या मतदारसंघातून आमदार होऊ शकला होता. विजयराज शिंदे हे २००९, २००४, १९९५ असे सलग तीनवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मागील २०१९च्या विधानसभा निवडणुकीतदेखील संजय गायकवाड हे शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. परंतु, त्यांना विजयराज शिंदे यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीचा फायदा तर त्यांचे प्रतिस्पर्धी हर्षवर्धन सपकाळ यांना फटका बसला होता. आ. संजय गायकवाड यांना ६७ हजार ७८५ मते तर विजयराज शिंदे यांना द्वितीय क्रमांकाची ४१ हजार ७१० मते मिळाली होती. तर हर्षवर्धन सपकाळ यांना ३१ हजार ३१६ मते मिळाली होती. दलित व ओबीसी मते विजयराज शिंदे यांच्याकडे वळल्याने काँग्रेसचे सपकाळ यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ३ लाख ६ हजार २७२ मतदार होते. त्यापैकी ५८.५१ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे २६ हजार ७५ मतांनी संजय गायकवाड यांनी विजय प्राप्त केला होता. या मतदारसंघात आ. संजय गायकवाड यांच्या बुलढाणा शहरातील विकासकामांचा बोलबाला असला तरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे जोरदार वारे निर्माण झालेले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही तुपकरांनी ३९ हजार मतांचा लीड येथून घेतला होता. तुपकरांची ही लाट आजही कायम असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून दिसून आले आहे.


बुलढाणा हा शेतकरी नेते रविकांत तुपकरांसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ – राजकीय सूत्र

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर केले असले तरी, इतर मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल, अशी राजकीय परिस्थिती आहे. तथापि, बुलढाणा मतदारसंघातून मात्र रविकांत तुपकर हे २२ ते २५ हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असे राजकीय धुरिणांचे मत आहे. आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला असला तरी, हा विकास फसवा असल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांनी चालविला आहे. या विकासाची पोलखोल करणारे व्हिडिओच माजी आमदार तथा काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ हे सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. महाआघाडीत हा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे असला तरी, तो काँग्रेसने मागितला आहे. लोकसभेप्रमाणे उद्धव ठाकरे हे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार नाहीत. तसेच, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पाहाता, जातीय समिकरणात बुधवत हे या मतदारसंघात चालणारे नाहीत. तसेच, काँग्रेसचे नेते खरोखर बुधवत यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील की नाही? याची काहीही शाश्वती नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना ‘लाँगटर्म राजकारण’ करायचे असेल तर त्यांना रविकांत तुपकर यांच्या मदतीला यावेच लागेल. म्हणजे, आ. संजय गायकवाड व रविकांत तुपकर यांच्या लढतीत तुपकर यांचा विजय होऊ शकेल. कारण, या निवडणुकीत आ. गायकवाड हे पुन्हा निवडून आले तर ते पुढील २५ वर्षे हा मतदारसंघ सोडणार नाहीत. त्यामुळे तुपकरांची जोरदार लाट आलेलीच आहे, तर या लाटेत काँग्रेस नेत्यांनाही तुपकरांच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय गत्यंतर नाही, असे राजकीय धुरिणांचे मत आहे. रविकांत तुपकर यांना ग्रामीण भागातून जोरदार प्रतिसाद असून, त्यांना जिल्ह्यातील इतरही महत्वपूर्ण नेत्यांची साथ मिळण्याची शक्यता चर्चिली जात आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!