– देऊळगाव माळीच्या विश्वाशांती बुद्धविहार भिक्खू निवास बांधकामासाठी १० लक्ष रुपये धम्मदान
बुलढाणा/देऊळगाव माळी (संजय निकाळजे) – जगाला मानवी कल्याण, सुख, शांती मिळवून देणारा शाश्वत मार्ग म्हणजे तथागत भगवान बुध्दाचा धम्म. धम्म आचरणाने मानवी जीवन दुःखमुक्त होऊन सुखकारक होते, याची अनुभूती संपूर्ण विश्व घेत आहे. त्यामुळे “सब्ब दानं धम्म दानं जिनाती” अर्थात सर्व दानात धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे. यासाठी महाराष्ट्रात २८ ठिकाणी स्वतःच्या पैशाने व स्थानिकांच्या सहकार्याने २८ बुद्धविहार बांधण्याचा सम्यक संकल्प भोईसर जि.पालघर येथील सुप्रसिद्ध उद्योजक महाउपासक शिवविलास सोनकांबळे व वैजयंतामाला सोनकांबळे परिवाराने केला आहे. प्रा. गजेंद्र गवई यांच्या पुढाकारातून नुकतीच बुलडाणा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या दे देऊळगाव माळीच्या विश्वाशांती बुद्ध विहारास भेट दिली. भेटी दरम्यान विश्वाशांती बुद्धविहार परिसराची पाहणी करताना धम्मगुरूच्या निवासासाठी भिक्खू निवास बांधकाम करण्यासाठी रु १०. ०० लक्ष देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समिती संचालक भास्करराव गवई होते तर समिती संचालक पदाधिकारी दत्ता गवई, नामदेव गवई, संजय गवई, जनार्धन गवई, नामदेव गवई, संघपाल गवई यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धविहारातील तथागताच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. समितीच्या वतीने सोनकांबळे परिवाराचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला. विश्वाशांती बुद्धविहार समितीचे सचिव प्रा. गजेंद्र गवई यांनी प्रास्ताविक संचालनामध्ये गेल्या २५ वर्षांपासून विश्वशांती बुद्धविहार समितीच्या वतीने नियमित महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन कार्यक्रम,धम्म परिषदा, श्रामनेर शिबीरे, उपासिका प्रबोधन शिबीरे, धम्म जागृती अभियान, पुरस्कार वितरण, विविध भन्तेची धम्मदेशना, कवी गायकांचे अनेक प्रबोधन कार्यक्रम, सामूहिक विवाह सोहळे,भव्य अन्नदान, खीरदान कार्यक्रम,आजूबाजूच्या जिल्ह्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील गावोगावी धम्मरथाद्वारे धम्म प्रबोधन, जनजागृती अभियान याप्रमाणे अनेक प्रचंड गर्दीचे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याची माहिती देऊन बुद्धटेकडी परिसराची माहिती दिली. या सर्व वातावरणात भोईसर उदयोजक शिवविलास सोनकांबळे व वैजयंतामाला सोनकांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विश्वशांती बुद्धविहार बुद्ध टेकडी परिसरात धम्मगुरू भिकखू, भन्तेसाठी सर्व सुविधा,सोईयुक्त आधुनिक प्रशस्त असे भिकखू निवास बांधकामसाठी धम्मदान म्हणून रु १०.००लक्ष देण्याची घोषणा केली. त्यामुळे धम्मकार्यास गती येऊन दानपारमिता प्रत्ययास आली. लवकरच भिक्खू निवासाचे बांधकाम सुरु करण्यात येईल अशी ग्वाही सोनकांबळे परिवाराने दिली. कार्यक्रमासाठी प्रा. केशव गवई, भिकाजीं गवई पहेलवान, वसंता गवई, प्रकाश अंभोरे, अर्जुन गवई पहेलवान, रमेश गवई, सुरेश गवई, रामदास हिवाळे,सह बहुसंख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार भास्करराव गवई यांनी मानले.