लोकशाहीचा उत्सव उद्यापासून; अपंग व वयोवृद्धांचे घरोघरी जाऊन मतदान!
- मेहकर विधानसभेत ७७४ मतदार, २९ पथके नियुक्त - १०० टक्के मतदान करून घेण्याचा प्रयत्न - तहसीलदार मडके
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – अपंग व ८५ वयाच्यावरील वयोवृद्ध मतदारांचे दि. १४ नोव्हेंबरपासून तीन दिवस घरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे. यासाठी २९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर मतदारांचे १०० टक्के मतदान करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे तहसीलदार नीलेश मडके यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी सध्या रणधुमाळी सुरू असून, येत्या २० नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. अशातच अपंग व ८५ वर्ष वयाचे वरील ज्या वृद्धांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होणार नाही. अशा मतदारांचे उद्या, १४ नोव्हेंबर ते १६ दरम्यान घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात अशा मतदारांची संख्या 774 एवढी आहे. सदर मतदान करून घेण्यासाठी २९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथक संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहे. ज्यांना मतदान केंद्रावर येणे शक्य नाही, अशा मतदारांचे यापूर्वीच तसे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. सदर मतदान हे संबंधित प्रतिनिधी समक्ष करून घेण्यात येणार आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघात अशा मतदारांचे १०० टक्के मतदान करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.