-पिके करपली, शेतकरी आर्थिक संकटात; तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी
मेहकर (सुरेश हुसे) : पावसाने दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारल्याने कडक उन्हाचा आणि पाण्याच्या टंचाईचा फटका पिकांना बसत असून, शेतकरी आर्थिक संकटाच्या छायेत सापडला आहे. कर्ज काढून पेरणी केलेली उभी पिके डोळ्यांदेखत करपताना पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याऐवजी केवळ बैठका घेऊन प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केला आहे.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीतील कथित सुखसोयी आणि खर्चाच्या मुद्द्यावरूनही टाले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा थेंब नाही, पिके करपून जात आहेत; मात्र दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामांचा आस्वाद घेतला जात असेल, तर हा शेतकऱ्यांच्या वेदनांशी विसंगत प्रकार आहे,” अशी टीका त्यांनी केली.
‘कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतात उतरा’
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या बैठका केवळ कागदोपत्री न राहता त्यातून प्रत्यक्ष मदतकार्य सुरू झाले पाहिजे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, बाधित क्षेत्राची नोंद घ्यावी आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी टाले यांनी केली. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च केला आहे. मात्र, पावसाअभावी पिके धोक्यात आल्याने उत्पादनाची अपेक्षा मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
पंचनामे करून तातडीने मदत द्या
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बाधित क्षेत्राचे विनाअट पंचनामे करणे, पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार हेक्टरी भरीव आर्थिक मदत देणे, कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत तातडीने दिलासा देणे आणि थकीत वीजबिलांबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळ आढावा बैठकीत केवळ परिस्थितीचे सादरीकरण न करता त्यावर तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
‘मदत मिळाली नाही तर आंदोलन’
“शेतकरी संकटात असताना केवळ बैठका आणि आश्वासने पुरेशी नाहीत. शासनाने तातडीने प्रत्यक्ष मदतकार्य सुरू करून बळीराजाला दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला.