-पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा निर्धार; निवडीबद्दल साखरखेर्डा परिसरात उत्साहाचे वातावरण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांचे विश्वासू सहकारी सैय्यद रफीक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे साखरखेर्डा परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सैय्यद रफीक यांनी आतापर्यंत सामाजिक व प्रशासकीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी यापूर्वी संजय गांधी निराधार योजना समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ समिती आणि जिल्हा रोजगार हमी योजना समिती यांसारख्या विविध शासकीय व निमशासकीय समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी राहणे, ही त्यांची ओळख राहिली आहे.
आपल्या निवडीचे संपूर्ण श्रेय त्यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाला व नेतृत्वाला दिले. तसेच जिल्हाध्यक्ष नरेश शेळके आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांचे आभार मानले. पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन, असा विश्वास सैय्यद रफीक यांनी व्यक्त केला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल साखरखेर्डा परिसरासह बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.