पंकजांची मनोज कायंदेंना सोडून शशिकांत खेडेकरांसाठी सभा!
- सिंदखेडराजात उलटसुलट चर्चेला उधाण; अजितदादा गट भाजपवर नाराज!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा येथे शिंदे गटाचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी जाहीर सभा घेत, खेडेकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. पंकजांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार मनोज कायंदे यांच्यासाठी सभा घेण्याचे सोडून शिंदे गटाच्या उमेदवारासाठी सभा घेतल्याने मतदारसंघातील एका गटात नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘मी निवडून येणार्यांच्या प्रचाराला येत असते. मी तुम्हाला विनंती करते आणि अजित पवारांची माफी मागते’, असे वक्तव्य प्रचारसभेतील जाहीर भाषणात पंकजा मुंडे यांनी केले.
सिंदखेडराजा मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आणि अजित पवार गटानेदेखील येथे आपला उमेदवार दिलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रावादीने घड्याळ चिन्हासह मनोज कायंदे यांना मैदानात उतरवलेले असून, धनुष्यबाण हाती घेतलेले शशिकांत खेडेकर यांच्यासमोर त्यांनी आव्हान निर्माण केलेले आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज जाहीर सभा घेत, शशिकांत खेडेकरांना विजयी करा, असे आवाहन केले, त्यामुळे अजित पवार गट नाराज झाला असून, वंजारी समाजातील कायंदे परिवाराला मानणार्या घटकांतही नाराजीची लाट पसरली आहे. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुनील कायंदे व महायुतीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी आजी-माजी पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते तथा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत खेडेकर यांच्या विजयाच्या आवाहनानंतर पंकजा मुंडे यांनी अजित पवारांची माफी मागितली आहे. आमदार मुंडे म्हणाल्या की, मी निवडून येणार्या उमेदवाराच्या पाठीशी असते. शशिकांत खेडेकर हे निवडून येणारे उमेदवार आहेत. कोणत्याही दबावाला बळी पडू नका. मग कोणी पाडायला उभं असतं, कोणी निवडून यायला उभं असतं. मी निवडून येणार्यांच्या प्रचाराला येत असते. मी तुम्हाला विनंती करते आणि अजित पवारांची माफी मागते.’ असं वक्तव्य प्रचारसभेतील जाहीर भाषणात पंकजा मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, या सभेला मी यावं हा माझा निर्णय आहे. हे मी निवडलंय. मला वाटतंय, यामध्ये कोणताही भेद नाही. मी राज्यभर फिरत आहे. अनेक ठिकाणी जाणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.