पुणे : “काव्य हे स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब असते. देहभान, आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही. मनातील भाव, सूक्ष्म निरीक्षण, भवतालाशी एकरूपता आणि संवेदनशील मन चांगल्या काव्याची निर्मिती करते,” असे प्रतिपादन शिवचरित्रकार व श्रीदत्त उपासक धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज उपाख्य श्री विजयराव देशमुख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा मिलाफ असलेल्या व शिवराज्याभिषेक सोहळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या ‘जागर भक्ती-शक्तीचा’ कार्यक्रमाला सद्गुरुदास महाराजांनी शुभाशीर्वाद दिले. जागर भक्ती-शक्तीचा एंटरप्राइजेस, स्वरप्रभा फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, व्हीनस स्पिरिच्युअल अँड हीलिंग कम्युनिटी ट्रस्ट, दुबईस्थित बिलिओ एफएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती आणि शक्तीला जोडणारा हा कार्यक्रम आयोजिला होता.
‘जागर भक्ती-शक्तीचा’ ध्वनिमुद्रिकेचे (अल्बम) प्रकाशन व प्रत्यक्ष सादरीकरण, तसेच ‘गंध अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अल्बममधील १० गाणी कथक नृत्य-गायन स्वरूपात सादर झाली. पराग पांडव यांनी गायन केले. आदिती गराडे यांनी संवादिनीवर साथसंगत केली. सुक्ष्मी कथक स्टुडिओच्या नृत्य कलाकारांनी ‘कवन मांडले शिवराजांचे’ यावर कथक नृत्यातून गण सादर केला.
न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी कवयित्री डॉ. संगीता बर्वे, अल्बमचे निर्माते कवी-गीतकार मंगेश निरवणे, ‘व्हीनस ट्रस्ट’चे शिरीष काकडे, अरुण बाभुळगावकर, सिरम इन्स्टिट्युटचे उमेश कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेखर मुंदडा, राजय शास्तारे, लेखक-दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर, प्रकाशक रुपाली अवचरे आदी उपस्थित होते. सहप्रायोजक प्रसाद पवार कार्यक्रमासाठी खास दुबईहून आले होते.
‘शिवराय जन्मले हो शिवराय जन्मले’च्या सुरांत दुमदुमलेल्या सभागृहात सळसळत्या शक्तीचा अनुभव रसिकांनी घेतला. सावळ्या विठू माऊलीच्या भक्तीत रसिक नहाले. नृत्यातील तत्कारात अन् स्वरांच्या झंकारात रसिक शहारले. ‘बयो दार उघड’ हा गोंधळ सादर झाला. ‘या मातीला गंध येत असे’, ‘गुरुजी हम शरीर, आप हो प्राण’, ‘आस लगली जी आता’, ‘चारही युगांची सावली माझी विठ्ठल माऊली’, ‘सावळा हरी सावळा’ अशी बहारदार गीते-गवळण सादर झाली.
सद्गुरुदास महाराज म्हणाले, “शक्ती आणि भक्तीचा संगम जगात फक्त महाराष्ट्रातच झाला आहे. गुरू देव दाखवतो; म्हणून पहिला नमस्कार गुरूला असतो. जगाला शिवाजी महाराज खूप कळायचे आहे. त्यांना समजणे एवढे सोपे नाही. त्यांना समजण्यासाठी डोळस दृष्टी हवी. महाराज दुर्गपती होते; म्हणून ते छत्रपती होऊ शकले. शिवाजी महाराज आभाळासारखे मोठे होते. हजारो वर्षातून एखादाच युगपुरुष निर्माण होतो. तो युगपुरुष महाराज होते.”
मंगेश निरवणे भावना व्यक्त करताना म्हणाले, “जीवनातील अनेक घटना हृदयात कोरल्या; कागदावर उतरल्या. देवावरील, शिवरायांवरील प्रेम या गीतांमधून जडले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संस्कारातून हे स्फुरण झाले. त्यांच्यासमोर कविता वाचायचो तेंव्हा त्यांनी जनाबाई वाचायला सांगितले. जनाबाईंचा सहजपणा, भाव, निष्ठा काव्यात उतरवता आला. गीतरामायण झाले, तसे गीत शिवायन व्हावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. संदीप तापकीर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
कविता रसिकांच्या अंतरंगाला भिडावी
“अनुभवाच्या अनुभुतीतून काव्य स्फुरतात. या कविता आत्मस्थित, आत्मानंदासाठी आहेत. अंतरंगातून स्फुरलेली कविता रसिकांच्या अंतरंगाला भिडते. त्यामुळे गंध अंतरीचे हे शीर्षक अगदी समर्पक आहे. यात साधी सोपी भाषा आहे. आनंदासाठी भक्तीतून साकारलेल्या या कवितांना शक्ती प्राप्त झाली आहे. आशय, आकृतीबंध यांचाही विचार यात दिसतो. जगण्यावर नितांत श्रद्धा असलेल्या कविता आहेत.”
– डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ कवयित्री
भक्ती-शक्तीचा जागर करणारा अल्बम
‘जागर भक्ती-शक्तीचा’ हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेला समर्पित केलेला अल्बम असून, यामध्ये एकूण १८ भजने व गीते आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रियांका बर्वे, अवधूत गांधी, पराग पांडव यांनी गायन केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने पराग पांडव यांनी या अल्बमला संगीत दिले आहे. या सर्व रचना कवी मंगेश निरवणे यांच्या आहेत. काव्यसंग्रह भक्ती, शक्ती, भाव आणि प्रेम या चार गंधात रचलेला आहे.