Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

सौ.जयश्री थोरातांवर विखेंच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याची अश्लाघ्य टीका; संगमनेर पेटले!

- पोलिस ठाण्यासमोर ठिय्या, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; डॉ. सुजय विखेंच्या ताफ्यातील गाडीही जाळली

– सुजय विखेंकडून कार्यकर्त्याच्या वक्तव्याचा निषेध; जयश्रीताई या माझी बहीण!

संगमनेर । नगर (जिल्हा प्रतिनिधी) – अहिल्यानगर (नगर)चे माजी खासदार तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव भाजप नेते डॉ. सुजय विखे यांचे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांच्याकडून माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. शहरात अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळीच्या घटनाही घडल्या. धक्कादायक म्हणाले, सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यानंतर सुजय विखे यांनीही या वक्तव्याचा निषेध केला असून, जयश्रीताई या मला बहिणीसारख्या आहेत, या वक्तव्याचा मीही निषेध करतो, असे ते म्हणाले.

माजी खासदार असलेले डॉ. सुजय विखे हे काँग्रेसचे नेते तथा संगमनेरमधील विद्यमान आमदार व उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, त्यांनी युवा संकल्प यात्रेचे निमित्ताने संगमनेर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी सभांचा धडाका सुरू केला आहे. काल शुक्रवारी संध्याकाळी धांदरफळी येथील सभेत विखे यांचे समर्थक ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात अतिशय घाणेरडे व आक्षेपार्ह वक्तव्य केले. ही सभा आटोपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि बाळासाहेब थोरात समर्थकांनी सभास्थळी ठिय्या मांडत, वसंतराव देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले. टीका करणार्‍यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी रात्री उशिरा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर जयश्री थोरात आणि दुर्गाताई तांबे यांच्यासह शेकडो थोरात समर्थकांनी ठिय्या मांडला. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर गुन्हे दाखल झाल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. आज सकाळी १० वाजता निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
या प्रकरणी सुजय विखे म्हणाले, की वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करणारच होतो. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरु केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या वसंत देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मात्र ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे. गाड्या जाळणार्‍यांचे फोटो, व्हिडीओ आमच्याकडे आहेत. मात्र मला वातावरण पेटवायचे नाही. या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. महिलांबद्दल कुणीही अशी टीका करू नये. माझ्या भाषणात मी जयश्री थोरात यांना ताई म्हणूनच संबोधित करतो. मलाही बहीण आहे, माझ्याही घरात महिला आहेत. मात्र कुणीही महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे सुजय विखे म्हणाले.


डॉ. जयश्री थोरातांबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’बद्दलची विकृत मानसिकता : नाना पटोले

  • महिलांचा अपमान करणाऱ्या अवलादींना माताभगिनीच व्याजासह त्यांची जागा दाखवतील.
  • विकृत वसंत देशमुखासह सुजय विखेंवर कडक कारवाई करा, निवडणूक आयोगानेही दखल घ्यावी.

लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज व पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा हिच भाजपाची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते, अशा विकृत मानसिकतेला माता भगिनीच त्यांची जागा दाखवतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यासंदर्भात भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संगमनेरच्या सभेत विखेच्या कार्यकर्त्याने, “निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही”, अशी थेट धमकी देत तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते. अशी वक्तव्य करणारा व्यक्ती वयाने ज्येष्ठ दिसतो. महिलांबद्दल अशी भाषा भाजपावालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रिजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील असेही नाना पटोले म्हणाले.

संगमनेर प्रकरणी भाजपाकडून आता सारवासारव केली जात आहे पण यामुळे त्यांची मानसिकता बदलणार नाही. पोलीस महासंचालकांनीही पक्षपाती न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे. वसंत देशमुख या विकृत व्यक्तीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. निवडणूक आयागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख व सुजय विखेवर कारवाई करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!