सिंदखेडराजात ‘राष्ट्रवादी’विरूद्ध ‘राष्ट्रवादी’च झुंजणार?
- शिंदे गटाचे नेते माजी आ. शशिकांत खेडेकरांच्याहाती अखेर अजितदादांचे 'घड्याळ'?
– विधानसभा निवडणुकीतून पंजा, धनुष्यबाण, कमळ, मशाल चिन्ह हद्दपार!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी महायुतीतून महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने अनेकांच्या समोर आपण कोठे राहावे? हा राजकीय प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या मतदारसंघात ‘तुतारी विरुद्ध घड्याळ’ असा सामना होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत मशाल, धनुष्यबाण, कमळ, पंजा ही निवडणूक चिन्हे हद्दपार होणार आहेत. राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत या मतदारसंघात आता रंगणार असल्याची दाट चिन्हे आहेत. एकच पक्ष दोघांत झुजवालया लावण्याची ‘फडणवीसी नीती’ या मतदारसंघात कमालीची यशस्वी झाली असली तरी, जनता काय कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आज माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीचे त्रांगडे कायम दिसत आले आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहेत. अखेर काल रात्री भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामंजस्य करार झाला असून, ही जागा राष्ट्रवादीला महायुतीत सुटल्यात जमा आहे. शिवसेना नेते तथा माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर (नाना) हे सकाळीच मुंबई येथे दाखल झाले असून, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश होत असल्याचे त्यांच्या निकचवर्तीय सूत्राने सांगितले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यावतीने सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असेल, ही खलबते अनेक दिवस चालली. फोकस फक्त महाविकास आघाडीकडे जास्त होता. महाविकास आघाडीचा उमेदवार शनिवारी फायनल झाला, तरी महायुतीला उमेदवारांची शोधाशोध सुरू होती. त्यात हा मतदारसंघ भाजपला सुटतो की शिवसेनेला सुटतो यातच चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या मतदारसंघात दावा केल्याने नेमका उमेदवार कोणता राहू शकतो? यात तर्कवितर्क काढले जात होते. भाजपकडे भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे हा चेहरा प्रबळ दावेदार होता. तर मागील दोन निवडणुकीत डॉ.शशिकांत खेडेकर यांनी निर्णायक मते घेतल्याने हा मतदारसंघ शिवसेना गटाला सुटल्यास तगडी लढत होऊ शकते, असा मत प्रवाह मतदारसंघात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे अनेकांनी उमेदवारी मागितली आहे. परंतु, केवळ उमेदवार देऊन चालणार नाही तर तो निवडून आला पाहिजे. या मेरीटवर अखेर उमेदवार निश्चित झाला आहे. त्यानुसार, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हातात अजित पवारांनी घड्याळ बांधण्याचे निश्चित केले असल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघात मराठा, वंजारी, बौध्द, माळी, बंजारा, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठी आहे. मराठा समाजात डॉ.राजेंद्र शिंगणे आणि डॉ.शशिकांत खेडेकर हे दोघेच उमेदवार आहेत. डॉ.शशिकांत खेडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करावा, तशी हिरवी झेंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यांना दिली होती. मतदारसंघात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर ज्यांनी ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागित असताना आपला आलेख सादर केला. त्या अनुषंगाने काम केले तरच निवडणुकीत चुरस निर्माण होईल. यासाठी उमेदवारी अर्ज २८ तारखेला ते भरणार आहेत. त्यावेळी कोणाकोणाची उपस्थिती लाभते, हे पाहावे लागणार आहे.