मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज, दि. २६ ऑक्टोबर रोजी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून श्रीमती स्वाती वाकेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, असे असताना खामगाव मतदारसंंघाबाबत मात्र अजूनही निर्णय झाला नसल्याने कार्यकर्त्याची घालमेल सुरू आहे. काँग्रेसने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना वेटिंगवर ठेवल्याने मतदारसंघात चांगलीच चर्चा सुरू आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून, दि. २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी सर्वच पक्ष जागावाटपात गुंतले आहेत. अनेक जागांवर विशेषतः महाविकास आघाडीत मोठी ताणाताणी होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी काँग्रेसने आपली ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर झालेल्या प्रचंड घडामोडींनंतर आज, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातून श्रीमती स्वाती संदीप वाकेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे येथून पक्षातीलच जवळजवळ २१ जण इच्छुक असल्याची माहिती आहे. शिवाय, राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटील यांनी येथून विधानसभेची तयारी चालवली होती. याशिवाय, अन्य उमेदवारांमध्ये भुसावळ डॉ. राजेश मानवतकर, अकोट महेश गणगणे, वर्धा शेखर शेंडे, सावनेर सौ.अनुजा केदार, नागपूर दक्षिण गिरीश पांडव, कामठी सुरेश भोयर, भंडारा (अजा) श्रीमती पूजा ठावकर, अर्जुनी मोरगाव अजा) दिलीप बनसोड, राळेगाव वसंत पुरके, यवतमाळ बाळासाहेब मांगुळकर, आर्णी (अज) जितेंद्र मोघे, उमरखेड (अजा) साहेबराव कांबळे, जालना कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मधुकर देशमुख, वसई विजय पाटील, कांदिवली पूर्व कालू बधेलीया, चारकोप यशवंत सिंग, सोईन कोळीवाडा गणेश यादव, श्रीरामपूर (अजा) हेमंत ओगळे, निलंगा अभय कुमार साळुंखे तर शिरोड मधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसची दुसरी यादी आली तरी माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांना काँग्रेसने वेटिंगवर ठेवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी सानंदा यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली होती, त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होत आहे. शिवाय, आकाश फुंडकर यांच्या तुलनेत सानंदा हे खामगावातून निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचीही चर्चा होत आहे.