शेतमाल घेऊन व्यापारी पळाला; शेतकर्यांना १० कोटींचा चुना!
बुलडाणा/ जिल्हा प्रतिनिधी
ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकर्यांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, चिखली तालुक्यातील जवळपास पाचशे ते साडेपाचशे शेतकर्यांचा शेतमाल खेडा पद्धतीद्वारे खरेदी करून व्यापारी व त्याचे साथीदार शेतमालासह पळून गेले आहेत. या घटनेत १० कोटींपेक्षा जास्त रकमेची शेतकर्यांची फसवणूक झाली आहे. तब्बल दोनशे शेतकर्यांनी तक्रारी दाखल करूनही चिखली व अंढेरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळ्यात कमालीची दिरंगाई चालवलेली आहे. परिणामी, शेतकरी कमालीचे संतप्त आहेत.
शेतमाल खरेदीतील फसवणुकीमुळे चिखली तालुका हादरून गेला आहे. तालुक्यातील खैरव, अंबाशी, गांगलगाव, भालगाव, घोडप, कोलारा, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, अंचरवाडी, मेरा, अमोना, िंपपळवाडी आदी गावांतील शेतकर्यांचा विश्वास संपादन करून संतोष बाबुराव रनमोडे व त्याचे साथीदार अशोक म्हस्के, नीलेश साबळे यांनी हरभरा, सोयाबीन आदी शेतमाल जादा दराचे आमिष दाखवून खरेदी केला. परंतु, पैसे न देता खोटे चेक देऊन हे भामटे पळून गेले आहेत. शेतकर्यांना न्याय मिळाला नाही तर राज्य महामार्गावर रस्तारोको करण्याचा इशारा शेतकर्यांनी या दिला आहे.
जवळपास पाचशे ते सहाशे शेतकर्यांची अंदाजे १० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे. संपूर्ण चिखलीसह मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांतही या प्रकरणाची व्याप्ती आहे.सर्व शेतकरी गरीब असून, त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळवून देणे ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची जबाबदारी आहे. त्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात एकत्र येऊन सरकार दरबारी व न्यायदरबारी संघर्ष करतील, असे मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी सांगितले.
पळून गेलेल्या आरोपीपैकी अशोक म्हस्के याची व्हाईस रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, हे आरोपी स्थानिक हस्तकांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. म्हस्के हा जमा केलेला शेतमाल गोडावूनमध्ये सुरक्षित ठेवून गोदामाला कुलूप लावण्याच्या सूचना या हस्तकांना देत आहे. हे रेकॉर्डिंग चिखली पोलिसांना प्राप्त होऊनही गोदामाला सील ठोकण्याची कार्यवाही अद्याप पोलिसांनी केलेली नव्हती. त्यामुळे हा शेतमालदेखील गायब होण्याची शक्यता आहे.