जिल्हा बँकेचा अवस्था अत्यंत वाईट; कोणत्याहीक्षणी जिल्हा बँक संपुष्टात येऊ शकते!
- 'केदारेश्वर'च्या ३५ व्या सर्वसाधारण सभेत प्रतापकाका ढाकणे यांचा गौप्यस्फोट
– राजकीय बळ देण्याचे सभासदांसह तालुकावासीयांना केले आवाहन
शेवगाव / नगर (बाळासाहेब खेडकर) – आशिया खंडात सर्वात अग्रेसर असणारी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूठभर कारखानदारीमुळे अडचणीत आली असून, कोणत्याहीक्षणी संपुष्टात येवू शकते. या बँकेची अवस्था अत्यंत वाईट आहे, असा गौप्यस्फोट अॅड. प्रतापकाका ढाकणे यांनी केला. शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रतापकाका बोलत होते.
या सभेत सभासदांना मार्गदर्शन करतांना अॅड. प्रतापकाका ढाकणे म्हणाले, की अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकर्यांच्या मालकीची बँक आहे. या बँकेची अवस्था आज काय आहे हे लवकरच जनतेला कळेल. ही बँक जिल्ह्यातील मूठभर चार-पाच कारखानदारांची नाही. ही बँक बुडाली तर शेतकर्यांना कर्ज देणार्या सोसायट्या अडचणीत येतील, आणि जिल्ह्यातील शेतकरी डबघाईला येतील. कोणत्याहीक्षणी अहमदनगर जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडू शकते, अशी बँकेची आज अवस्था निर्माण झाली आहे. केदारेश्वर कारखान्याचा जन्म होत असताना अनेकांच्या नजरा लागल्या. नंतर सुरु झाल्यावर चोहोबाजुंनी सातत्याने आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तरीही आलेल्या संकटावर मात करून स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेबांनी कारखाना उभा करून यशस्वीपणे चालवला. सहा वर्ष शेतकर्यांचे, कामगारांचे ऊसतोड मजुरांचे आणि वाहतुकदारांचे पैसे वेळेवर दिले आहे. काही अडचण आली आहे ती थोड्याच दिवसात सुटणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
केदारेश्वर कारखान्याची निर्मिती करतांना सामान्य माणसांना वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झाली आहे. शेकडो वर्षापासून मानवजातीचा इतिहास हा वर्गसंघर्षाच्या लढ्याचा, आहे-रे आणि नाही-रे वर्गाचा आहे. आणि म्हणून नाही-रे वर्गाला सोबत घेवून गरीब माणसांना मोठे करण्याचा स्वर्गीय ढाकणे साहेबांचा वारसा आपण पुढे नेत आहोत. पक्षीय राजकारणात जरूर त्रास द्या, पण केदारेश्वर ही शेतकर्यांची कामधेनू आहे. त्यामध्ये त्रास देवू नका, अशी विनंती त्यांनी प्रस्थापितांना केली. जिल्ह्यातील इतर कारखान्यांकडे ५०० कोटींच्या पुढे कर्ज आहे. हा कारखाना लवकरच कर्जमुक्त करून सभासदांना लाभांश देण्याचा मानस आहे. राजकीय लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकुच, पण लढाईसाठी खंबीर पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वीनकुमार घोळवे यांनी चालू गळीत हंगामाच्या नियोजनाविषयी माहिती देवून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी भाऊसाहेब पोटभरे, सर्जेराव दहिफळे यांची भाषणे झाली. चेअरमन ऋषीकेश ढाकणे यांनी अहवाल वाचन केले तर नोटीस वाचन कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार संचालक डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले. यावेळी संचालक, अधिकारी, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.