BuldanaBULDHANAHead linesVidharbha

बुलढाण्यात आ. गायकवाड समर्थक – काँग्रेस आमने-सामने!

- पोलिसांच्या सतर्कतेने राडा टळला; दोन्ही गट आक्रमक; जयस्तंभ चौकाला आले छावणीचे स्वरूप

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते तथा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची जाहीर सुपारी दिल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने आज (दि.२०) बुलढाण्यात आंदोलन करण्यात आले व संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आ. गायकवाड यांचे समर्थकही रस्त्यावर उतरले. स्थानिक जयस्तंभ चौकात राडा होण्याची शक्यता पाहाता, पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक बोलावल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे, आ. गायकवाड यांची दहशत मोडीत काढण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, राहुल बोंद्रे या तरूण नेत्यांची फौज रस्त्यावर उतरल्याचे काल दिसून आले होते. त्यामुळे कालच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापेक्षा काँग्रेसच्या आक्रमक आंदोलनांमुळे कालचा दिवस गाजला होता. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस व आ. गायकवाड यांचे समर्थक आमने-सामने आल्याचे दिसून आले होते. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने राडा टळला आहे. दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे, बुलढाण्यात आंदोलानासाठी निघालेल्या राहुल बोंद्रे यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्षांना बुलढाणा पोलिसांनी सहकार विद्या मंदिराजवळच ताब्यात घेऊन त्यांना चिखलीला नेऊन सोडले होते.

सविस्तर असे, की आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे तरूण नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या विधानाच्या विरोधात युवक काँग्रेसने आज (दि.२१) गांधी भवन येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आमदार गायकवाड समर्थकांनीदेखील जयस्तंभ चौकात येऊन प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही गटांमध्ये नारेबाजी सुरू झाल्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने जयस्तंभ चौकामध्ये धाव घेतली. यावेळी जयस्तंभ चौकाला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामध्ये आ. गायकवाड यांचे समर्थक श्रीकृष्ण शिंदे, नगर परिषदेचे माजी सभापती आशीष बावस्कर, युवा सेनेचे श्रीकांत गायकवाड, धाड येथील नीलेश गुर्जर असे काही प्रमुख चेहरे दिसून आलेत. विशेष म्हणजे, आ. गायकवाड यांना जशाच तसे उत्तर देत, ‘हे घे ! घुसलो तुझ्या कार्यक्रमात . .दाखवले काळे झेंडे. . मग सांग आता, कुठे गाडतो?’ अशा शब्दांत माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ यांना सोशल मीडियावरून ललकारले होते. त्यानंतर आज दुपारी काँग्रेस व आ. गायकवाड यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनीदेखील जोरदार घोषणाबाजी केली व आ. गायकवाड यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काँग्रेसचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले. दोन्ही गटांमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता पाहता, पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला होता. तसेच, दोन्हीही गटांना शांततेत पांगण्याची सूचना केली होती. आ. संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची सुपारी जाहीर केल्यानंतर कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी आ. गायकवाड यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आज काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलने करण्यात आलीत. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाण्यात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ, आ. धीरज लिंगाडे यांच्यासह कार्यकर्ते ताब्यात घेतले होत.

एकतर्फी कारवाईचा काँग्रेसकडून निषेध

काँग्रेसने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसचे आंदोलन होऊ देणार नाही, अशी भूमिका संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतली होती. पोलिसांनी मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरच एकतर्फी कारवाई केली, यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधून प्रचंड संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, चिखली येथून बुलढाणा येथे आंदोलनासाठी निघालेल्या युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह इतर नेत्यांना बुलढाणा पोलिसांनी सहकार विद्या मंदिराजवळच अडवून त्यांना पुन्हा चिखलीला परत नेले. परिणामी, बुलढाणा येथील संभाव्य राडा टळू शकला. तथापि, आ. गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांना शहरातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आंदोलन केले. दुसरीकडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आ. धीरज लिंगाडे यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस सत्ताधार्‍यांच्या दबावात वागत असून, पोलिस सत्ताधार्‍यांचे चमचे झाले आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पोलिसांनी आ. गायकवाड यांच्यासह त्यांच्या गुंडांवर कारवाई करायला पाहिजे होती तर ते आमच्यावर कारवाई करत आहेत. आमचे बॅनरदेखील पोलिसांनी काढून टाकले आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

हाच व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आ. संजय गायकवाड यांना सोशल मीडियावरून ललकारले होते.

https://x.com/harshsapkal/status/1836699354255507816

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!