वंजारी समाज राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी एकनाथराव ढाकणे
- समितीच्या बैठकीत एकमताने झाली निवड; राष्ट्रसंत भगवानबाबा, संत वामनभाऊंच्या विचारांचा देशभर जागर करणार
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – वंजारी समाज राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी एकनाथराव ढाकणे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत वंजारी समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत भगवानबाबा, संत वामनभाऊ, अवजिनाथ बाबा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती, पुण्यतिथी उत्सव संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजामध्ये साजर्या व्हाव्यात, यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
वंजारी समाजामधील अंधश्रद्धा रुढी परंपरा नष्ट होऊन समाज मुख्य प्रवाहाबरोबर शिक्षणाबरोबर स्वयंरोजगारांमध्ये स्वावलंबी व्हावा, या उद्देशाने संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्ये उत्सव समितीचे कार्य चालू आहे. या कमिटीचा विस्तार आणि भविष्यकालीन वंजारी समाजाचे ध्येय धोरण, जडणघडण, आध्यात्मिक भगवानबाबा, वामनभाऊंचे कार्य व त्यांचे विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोच करण्याच्या हेतूने समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली होती. राष्ट्रीय जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडा तसेच अध्यात्मिक क्षेत्रात भरीव कार्य करत आहे. राज्य ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केलेल्या विविध क्षेत्रात भरीव कार्याची राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे, सचिव तुकाराम सांगळे यांनी दखल घेत, सदर संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी विक्रम नागरे, नामदेव सानप, डॉ. अंबादास डोंगरे, आदी पदाअधिकारी उपस्थित होते. ढाकणे यांच्या निवडीमुळे संघटनेच्या भविष्यकाळात विस्तार वाढण्यासाठी भरीव मदत होणार आहे. त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचा राज्यभर संघटनाचा विस्तार वाढवून समाजाला न्याय हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री ढाकणे यांनी यावेळी सांगितले.