Breaking newsHead linesMaharashtraPachhim Maharashtra

१५ कोटी पकडले होते, पण ५ कोटीच दाखवले; सत्ताधारी आमदारांना १५ कोटींचा पहिला हप्ता पोहोचला!

- खेड-शिवापूर परिसरात ५ कोटीची रोकड पकडल्यानंतर खा. संजय राऊतांचा सत्ताधार्‍यांवर गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यानी पत्रकार परिषदेत सांगोला येथे जप्त करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पोलिसांनी दोन गाड्यामध्ये एकूण १५ कोटींची रक्कम पकडली होती. मात्र, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आल्याने फक्त ५ कोटी जप्त केल्याचे दाखवत, १० कोटी रुपये झाडी, डोंगरातून योग्य ठिकाणी पोहचवण्यात आले आहेत. तसेच याबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगाची तोंडे बंद केल्याने तेदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. या घटनेवरून महायुतीकडून पैशांचे वाटप सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले. तसेच जागावाटापाचा प्रश्न आज मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या पाच कोटी रूपये पकडल्याचा व्हिडिओच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार तथा नेते संजय राऊत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून सत्ताधारी आमदारांना निवडणुकीसाठी प्रत्येकी ५० कोटींची आर्थिक रसद पोहोचवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुण्याच्या खेड शिवापूर परिसरात एका गद्दार आमदाराच्या गाडीतून १५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, पण त्यापैकी ५ कोटीच रुपये दाखवण्यात आले, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याहून एक फोन आला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्याविषयी आमच्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. या गाडीत हजर असणार्‍या लोकांचे काय झाले? या गाडीचे कुणीतरी माय-बाप असतील म्हणजे ती कुणाच्या तरी नावे असेलच ना? पण त्यांना सोडण्यात आले. केवळ पैसा पकडण्यात आला. त्यामुळे हा पैसा मुख्यमंत्री कार्यालयातून ऑपरेट होत आहे हे स्पष्ट होते, असेही खा. राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या माणसांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १५ कोटींचा पहिला हप्ता पाठवण्यात येत होता. पण तो काल पकडण्यात आला. हे पैसे सांगोल्याच्या गद्दार आमदाराचे होते. पण आता केवळ ५ कोटी दाखवण्यात येत आहेत. १० कोटी सोडून देण्यात आलेत. त्याच आमदाराचे लोक गाडीत होते. पण एक फोन आला आणि एक गाडी सोडली. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. आमच्या माणसांमुळे हे ५ कोटी रुपये जप्त झालेत. राज्यातील सत्ताधारी १५० आमदारांना प्रत्येकी १५ कोटी रुपये पोहोचलेत. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पण आमच्या खिशात २-४ हजार रुपये सापडले तरी आमच्यावर अटकेची कारवाई होईल, अशी स्थिती आहे. हे एक उदाहरण आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून कशा प्रकारे पैशांचे वाटप सुरू आहे, असेही खा. राऊत म्हणाले. तसेच, भाजपचे लोक निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे घाणेरडे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या भागात कुणाला जास्त मतदान झाले, त्या हिशेबाने मतदार यादीतून नाव वगळण्यात येत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!