जिल्ह्यात विधानसभेसाठी बहुतांश लढती जुन्याच!
- मेहकर, बुलढाण्यात उद्धव ठाकरेंकडून पहिल्याच फटक्यात काँग्रेस 'घायाळ'!
– चिखली, मलकापूर, जळगाव जामोदमध्ये उमेदवार अन् ‘सिम्बॉल’ही तेच!
– मागीलवेळी काँग्रेसला ‘दगा’ देणारच्या चर्चेने राहुल बोंद्रेंना दाखवला होता इंगा!
– सिंदखेडराजात फक्त चिन्हच बदलले; खामगावात काँग्रेसचे ‘फिर वही दिल लाया हू’!
– बुलढाण्यात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराने ‘मशाल’ पेटवली!
– अन्यायाचा पाढा वाचत मेहकर व मलकापुरात काँग्रेस नेत्यांची बंडखोरीची धमकी?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पक्षीय लढती व उमेदवारीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले असून, बहुतांश लढती या गेल्या निवडणुकीतल्याच असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चिखली, मलकापूर व जळगाव जामोद मतदारसंघात तर उमेदवार व चिन्हही तेच आहे. चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे यांनी गेल्यावेळी कधी भाजप तर कधी शिवसेना, अशी तळ्यात मळ्यात भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांना फटका बसला होता. सिंदखेडराजा मतदारसंघात फक्त चिन्ह बदलले असून, उमेदवार मात्र तेच राहणार आहेत. तर खामगावमध्ये काँग्रेसने पुन्हा आपल्या जुन्या पहेलवानाला नव्या दमाने आखाड्यात उतरवले आहे. मेहकर व बुलढाणा विधानसभेवर शिवसेना (ठाकरे) पक्षाने जोरदार ‘हक्क’ दाखवत पहिल्याच’ इनिंग’मध्ये काँग्रेसला येथून ‘आउट ‘केले. आपल्यावर अन्याय कसा झाला, याचा पाढा वाचत मेहकर व मलकापुरात काँग्रेस नेत्याने बंडखोरीची धमकी दिली आहे. बुलढाणा विधानसभेत तर चक्क काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारानेच ‘हाती’ ‘मशाल’ घेतली आहे, असे असताना मेहकर व बुलढाणा विधानसभेत दोन शिवसेनेत होणाNया या लढतीकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीचे चित्र ४ नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्याने, जिल्ह्यातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचे सध्यातरी दिसत आहे. चिखली मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपच्या श्वेताताई महाले व काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांच्यातच लढत झाली होती. त्यावेळी राहुल बोंद्रे यांना भाजप, शिवसेनेचा ‘लळा’ लागल्याच्या चर्चेचा फटका बसला होता, अशी चर्चा आजही होत आहे. मलकापुरातून भाजपचे चैनसुख संचेती व काँग्रेसचे राजेश एकडे यांच्यातच लढत होऊन, यामध्ये पाच वेळा आमदार राहिलेले चैनसुख संचेती यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. जळगाव जामोदमध्ये भाजपचे आमदार संजय कुटे व काँग्रेसच्या स्वातीताई वाकेकर यांच्यात सामना रंगला होता. येथे स्वाती वाकेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. विशेष म्हणजे, यावेळीही तेच उमेदवार त्याच पक्षाकडून येथून लढत आहेत. सिंदखेडराजा विधानसभेत गेल्यावेळी शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होऊन येथून डॉ. राजेंद्र शिंगणे विजयी झाले होते. यावेळी पक्ष व चिन्ह बदलले असले तरी लढत मात्र या दोघातच होणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, येथून राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी फुंकली असून, डॉ. शशिकांत खेडेकर हाती घड्याळ बांधणार आहेत. तर येथून भाजपही जोरदार दावा सांगत आहे. गेल्या निवडणुकीत रेस्ट घेतलेले दिलीपकुमार सानंदा यांना यावेळी काँग्रेसने मैदानात उतरवले असून, येथे त्यांची भाजपचे आकाश फुंडकर यांच्यासोबत लढत होणार आहे. मागीलवेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर येथून ज्ञानेश्वर पाटील यांचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला होता. शिवसेना फुटीनंतर मेहकरचे आमदार संजय रायमुलकर व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे या दोन्ही जागांवर उद्धव ठाकरे शिवसेनेने जोरदार हक्क दाखवत, येथून पहिल्याच ‘इनिंग’मध्ये काँग्रेसला चक्क ‘आऊट’ केले. मेहकरातून काँग्रेसकडे जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प. अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे, अनंतराव वानखडे व साहेबराव पाटोळे यांनी दावेदारी सांगितली होती. येथे शिवसेना ठाकरे गटाने मंत्रालयीन माजी प्रशासकीय अधिकारी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे यांनी संताप व्यक्त करत, आपल्यावर अन्याय झाल्याचा पाढा बैठकीत वाचत व उमेदवार बदलला जाईल, असे कारण पुढे करत, चक्क बंडखोरीची धमकी दिली आहे. परंतु त्या धमकीचा ‘आवाज’ जास्त काळ राहणार नाही, अशीही चर्चा मतदारसंघात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक प्रा.गोपाल बशिरेही हे तर मंगळवारी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे. मलकापुरातही अॅड. हरीष रावळ यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. बुलढाणा विधानसभेत तर शिवसेनेने चक्क काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या, संभाव्य उमेदवार जयश्री शेळके यांच्या हाती’ मशाल’ दिली. त्यामुळे येथे काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये मोठी कुरबुरी सुरू असल्याचे सांगितले जात असून, ती निवळेल अशी आशा आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दोन शिवसेना आमने-सामने आल्याने खरी शिवसेना कोणती, याच्या फैसल्याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी देऊ म्हणून आशेलादेखील लावले. परंतु, ऐनवेळी पक्ष पदाधिकाNयांच्या दबावापुढे झुकत, काँग्रेसमधून गेलेल्या जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी दिली. परिणामी, तुपकर यांनी महाआघाडीच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फायदा अर्थात, महायुतीला होण्याची शक्यता आहे. तुपकरांनी मेहकरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार व एकेकाळच्या त्यांच्या सहकारी डॉ. ऋतुजा चव्हाण यांना जाहीरपणे पाठिंबा दिला असून, ते उद्या त्यांच्या प्रचारासाठी जाहीरसभादेखील घेत आहेत. तसेच, सातही मतदारसंघात ते उमेदवार देणार आहेत. त्यामुळे महाआघाडीला जिल्ह्यात मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
—-