लोकांना विकासकामं करणारा लोकप्रतिनिधी हवा; राहुल गांधीच काय सोनियाजी आल्या तरी चिखलीची हवा पालटणार नाही!
- आ. श्वेताताईंनी साधला राहुल गांधींवर निशाणा!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – लोकांना विकासकामे करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो, काँग्रेसच्या विद्यमान उमेदवारांना लोकांनी दहा वर्षे संधी दिली होती, त्यांना लोकांची कामे करता आली नाहीत, की विकासकामे करता आली नाहीत. आमच्या अडिच वर्षाच्या सत्ताकाळात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत, त्यामुळे राहुल गांधीच काय पण सोनिया गांधी आल्या तरी चिखलीची हवा बदलणार नाही, असा निशाणा महायुतीच्या भाजपच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावर साधला आहे.
काँग्रेसच्यावतीने त्यांच्या स्थानिक उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांची प्रचारसभा आज चिखलीत घेण्यात येणार होती. या सभेने मतदारसंघातील वातावरण बदलेल, असे चित्र निर्माण करण्यात आले. परंतु, सभेला बाहेरून आलेली माणसं वगळता मतदारसंघातील नागरिकांनी या सभेकडे पाठच फिरवल्याचे दिसून आले. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रस्ते, वीज, पाणी, शेतरस्ते, सभामंडप, वैयक्तिक लाभाच्या योजना यांची कामे झालेली असल्याने आ. श्वेताताईंचा विजय निश्चित मानला आहे. मतदारसंघात श्वेताताईंचीच लाट निर्माण झालेली असून, त्यांचे राजकीय विरोधक पूर्णपणे पराभवाच्या छायेत दिसून येत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेमुळे काही फरक पडेल, असे काँग्रेसच्या उमेदवारांना वाटले असावे, पण ही सभाही निरर्थक गेल्याची चर्चा मतदारसंघात रंगते आहे.
राहुल गांधींचा चिखली दौरा रद्द!
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सभा आज (दि.१२) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित केली होती. परंतु, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधी यांचा हा दौर रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज चिखलीला यायचे होते. तेथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि एका जाहीर सभेला संबोधित करायचे होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकत नाही. मला माहित आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, भारत सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल.