हा राहुल बोंद्रेंना अपशकून का?; राहुल गांधींची चिखलीतील सभा रद्द!
- गर्दी कमी असल्याने सभा रद्द झाली? की खरेच विमानात तांत्रिक बिघाड होता?
– चिखलीत वेगवेगळ्या चर्चांना आले उधाण!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाआघाडीचे काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची सभा आज (दि.१२) चिखलीत आयोजित करण्यात आली होती. परंतु, ही सभा राहुल गांधी यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगून अचानक रद्द केली. ही सभा रद्द झाल्यानंतर आता चिखलीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून, राहुल बोंद्रे यांना पहिलाच अपशकून झाल्याचे लोकांतील चर्चेतून बोलले जात आहे. तसेच, सभेला पाहिजे तशी गर्दीच जमली नाही, त्यामुळेच राहुल गांधींनी सभा रद्द केली, अशीही चर्चा सभास्थळी ऐकायला येत होती.
चिखली येथे राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारीही करण्यात आली होती. परंतु, अचानक राहुल गांधी यांनी सभा रद्द केली. याबाबत एक व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांची माफीही त्यांनी मागितली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चिखलीला येऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चिखलीत राहुल बोंद्रे व श्वेताताई महाले पाटील यांच्यात जोरदार लढत होत आहे. मागील अडिच वर्षाच्या महायुतीच्या सत्ताकाळात श्वेताताईंनी अक्षरशः विकासाचा डोंगरच चिखली मतदारसंघात उभा केला. त्या तुलनेत राहुल बोंद्रे यांना मतदारांवर फारशी छाप सोडता आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची सभा त्यांच्यासाठी ऊर्जितावस्था देणारी ठरली असती. परंतु, दुर्देवाने ती रद्द झाली आहे. त्यामुळे राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकार्यांना मोठा धक्का बसला आहे. तर स्थानिक चिखलीकरांतून मात्र राहुलभाऊंना पहिलाच अपशकून झाल्याची चर्चा ऐकायला येत होती. तसेच, या सभेला पाहिजे त्या प्रमाणात गर्दी जमू शकली नाही, त्यामुळेच राहुल गांधी यांनी आपली सभा रद्द केली, अशीही एक चर्चा सभास्थळी लोकांतून ऐकायला येत होती. दरम्यान, चिखलीत राहुल गांधी येवोत, की सोनियाजी. चिखली मतदारसंघातील लोकांचे मत आपल्या बाजूनेच आहे. लोकं विकासालाच मतं देणार आहेत, असे सांगून श्वेताताई महाले यांनी जनतेच्या कौलावर विश्वास व्यक्त केला आहे.