Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत श्वेताताई महाले दाखल करणार उमेदवारी अर्ज

- उद्या चिखलीत भाजप - महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

– देवेंद्र फडणवीस काय बोलतात? याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष!

चिखली (रघुनाथ गवई) – महायुतीच्यावतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार्‍या आ. श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या, २८ ऑक्टोबररोजी चिखली येथे येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज सादर होणार असून, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह महायुतीचे नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. भाजप आणि महायुतीचे मोठे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे.

आ. श्वेताताई महाले यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील खामगाव चौफुली येथून सकाळी १२ वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक या मार्गे ही रॅली राजा टावरच्या परिसरात आल्यानंतर तेथे रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होईल. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि नेते संबोधित करणार आहेत. तरी याप्रसंगी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना यासह महायुतीमधील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्यामुळे आ. श्वेताताई महाले यांनी पहिल्याच दिवशी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत असून, भारतीय जनता पक्षासाठी आ. महाले यांची जागा किती महत्त्वाची आहे हेदेखील अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!