Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

स्वकीय, राजकीय विरोधकांना शेतकर्‍यांची ‘वाघीण’ एकटीच भीडणार!

- स्वकीयाने अचानक साथ सोडल्यानंतरही डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी केला निवडणुकीची 'खिंड लढविण्याचा' निर्धार!

– मेहकर-लोणारच्या विकासासाठी मायबाप जनता मतांचा आशीर्वाद निश्चितपणे देण्याची ऋतुजाताईंना खात्री
– शेतकरी चळवळीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या खांद्याला खांदा लावून लढले; शेतकरी, कष्टकरी जनता माझे योगदान विसरणार नाहीत – डॉ. चव्हाण

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्यासोबत निवडणुकीत खंबीरपणे उभे राहणारे एक शेतकरी नेते यांनी अनाकलनीयरित्या ऋतुजाताईंची साथ सोडली आहे. त्यांनी अचानक व संशयास्पदरित्या एक्झिट घेतल्याने शेतकरी चळवळीतील कार्यकर्तेही विविध चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान, सत्ताधारी व विरोधकांशी आपण ताकदीने लढू, या मतदारसंघातील जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये असून, माझे शेतकरी चळवळीतील योगदान शेतकरी, कष्टकरी वर्ग विसरलेला नाही. लोणार व मेहकर तालुक्यांच्या विकासासाठी मायबाप जनता मलाच भरभरून मतरूपी आशीर्वाद देतील, अशी खात्री डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पहिल्या दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात असल्या तरी, मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या अफवांत काहीही तथ्य नाही. मी मैदानात पदर खोचून उभी असून, मतदारसंघाचा गेल्या तीस वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.

No photo description available.वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे, त्यांची लोकप्रियतादेखील कमालीची वाढलेली आहे. त्यांनी मांडलेले विकासाचे मुद्दे व त्यासाठी आमदार म्हणून निवडून देण्याची त्यांची विनंती मतदारांनी मान्य केलेली आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गासह अठरापगड जातीतील बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. कालपर्यंत शेतकरी चळवळीतील एक शेतकरी नेते डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा खंबीरपणे सांभाळत होते. पण, अचानकपणे त्यांनी डॉ. ऋतुजाताईंचा प्रचार थांबवला आहे. या त्यांच्या निर्णयाबद्दल मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, आपण मैदानात खंबीरपणे उभे असून, शेतकरी, कष्टकरी, गोरगरिब जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेत पोहोचूच, असा निर्धार डॉ. ऋतुजाताईंनी व्यक्त केलेला आहे. योग्यवेळी सर्व बाबींचा खुलासा करू, असेही त्यांनी सांगितले. आपली लढाई स्वकीय, परकीय व राजकीय विरोधक अशी तिहेरी आहे. आपण अभिमन्यूसारखे एकटेच लढत असून, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हे राजकीय चक्रव्युह निश्चित भेदू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

गेली ३० वर्षे विरोधकांनी या मतदारसंघाला मागासलेले ठेवले. मतदारसंघात धड रस्ते नाहीत, की लोकांना पाणी नाही. आरोग्याची तर अतिशय दुरवस्था आहे. मतदारसंघात कधी नव्हे तो जातीयवाद माजलेला आहे. दादागिरी व गुंडगिरी बोकाळलेली आहे. शेजारच्या चिखली व बुलढाणा मतदारसंघात जोरदार विकास होऊ शकतो, तर मेहकर-लोणारमध्ये का नाही? विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठीच आपण विधानसभेची निवडणूक लढवत आहोत, आणि आपली भूमिका सर्व मायबाप मतदार जनतेला पटलेली आहे. येत्या २० तारखेला ही जनताच मला मतदान यंत्रातून भरभरून आशीर्वाद देतील. माझ्याबाबत काहीही अफवा पसरविणार्‍यांना जनतेचे मतदान हेच उत्तर असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मी तुमच्या आशीर्वादाने मैदानात असून, एकटीच सर्वांशी लढते आहे, मला आपले बळ द्या, असे भावनिक आवाहनही डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केले आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!