राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, प्रतापकाका ढाकणे, अनिल देशमुख यांना पहिल्या यादीत स्थान
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर
– पारनेरातून राणीताई लंके, आष्टीतून मेहबूब शेख तर सोलापूरमधूम महेश कोठे मैदानात!
नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज (दि.२४) जाहीर करण्यात आली. या यादीत अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे परत गेलेले आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सिंदखेडराजा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, बारामतीतील बहुचर्चित लढत अजित पवारविरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यातच रंगणार आहे. काटोलमधून अनिल देशमुख, घनसावंगीतून राजेश टोपे, पारनेरमधून नगरचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके, शेवगाव-पाथर्डीतून प्रतापकाका ढाकणे, सोलापूर (मध्य)मधून महेश कोठे, तर आष्टीतून मेहबूब शेख यांच्यासह ४५ उमेदवार शरद पवार यांनी मैदानात उतरवलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरूवारी सायंकाळी आपल्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात इस्लामपूर येथून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काटोल येथून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, घनसांगवी येथून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंब्रा- कळवा येथून पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड व इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ८५, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ८५ जागा, तर काँग्रेसला ८५ जागा असा हा फॉर्म्युला ठरलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तिन्ही पक्षांना २७० जागा मिळणार आहेत. तर मित्रपक्षांना १८ जागांवर उमेदवार देता येणार आहेत. शरद पवारांच्या यादीनुसार, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना तर कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोरेगावमधून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. बारामतीतून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. ते त्यांचे काका अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान देतील. त्यामुळे बारामतीत काकाविरूद्ध पुतण्या असा संघर्ष पहायला मिळणार आहे. बहुचर्चित सोलापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार अखेर ठरला. माजी महापौर महेश कोठे यांना उद्या शरद पवार गटाकडून एबी फॉर्म दिला जाणार असून, ते २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या विजयकुमार देशमुखविरुद्ध महेश कोठे यांच्यात लढत होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवार आणि अजित पवार दोघांनाही इशारा
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. जर मुद्दाम निर्देशांचे उल्लंघन कोणी केले तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. तर आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे.
मनोज जरांगे पाटलांचे उमेदवार २९-३० तारखेला ठरणार!
प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार उभा राहील, यासाठी आज मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांची बैठक झाली. एकच उमेदवार मतदारसंघात निश्चित केला जाईल, उमेदवार निश्चित झाल्यानंतर इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे. आज उमेदवार जाहीर करणार नाही. २९ -३० तारखेला आमचे उमेदवार जाहीर करू, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटी येथे इच्छुक उमेदवारांच्या बैठकीपूर्वीचे पत्रकारांचे संवाद साधत होते.
————
– उमेदवारांची यादी –
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसांगवी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
प्राजक्त तनपुरे – राहुरी
अशोकराव पवार – शिरुर
मानसिंगराव नाईक – शिराळा
सुनील भुसारा – विक्रमगड
रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर
डॉ. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
सुधाकर भालेराव – उदगीर
चंद्रकांत दानवे – भोकरदन
प्रदीप नाईक – किनवट
विजय भांबळे – जिंतूर
पृथ्वीराज साठे -केज
संदीप नाईक – बेलापूर
बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी
दिलीप घोडपे – जामनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
रविकांत गोपचे – तिरोडा
भाग्यश्री आत्राम – अहेरी
रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी – बदनापूर
सुभाष पवार – मुरबाड
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम – आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वरपे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव
राणी लंके -पारनेर
मेहबूब शेख – आष्टी
नारायण पाटील – करमाळा
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव – चिपळूण
समरजित घाटगे – कागल
रोहित आर. पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
चरण वाघमारे – तुमसर
प्रशांत जगताप – हडपसर