बुलढाण्यात संजय गायकवाडांची जयश्रीताईंशी लढत फायनल!
- शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला; लवकरच दाखल करणार उमेदवारी अर्ज
– काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टनंतर निर्माण झालेले संशयाचे वातावरण निवळले!
– बुलढाण्यात पहिल्यांदाच होतेय तगडी फाईट!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत बुलढाण्यात पहिल्यांदाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना तगडी फाईट मिळणार आहे. फायर ब्रॅण्ड नेत्या जयश्रीताई शेळके यांनी काल शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश घेतल्यानंतर, त्यांना कालच एबी फॉर्मही देण्यात आला आहे. त्या लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, हे वातावरण आता निवळले आहे.
शिवसेनेत बंडखोरी करणारे आमदार संजय गायकवाड यांना पराभूत करण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांनी जयश्रीताई शेळके यांच्यासारख्या आक्रमक व सर्वसमावेशक नेतृत्वाला शिवसेनेत घेऊन बुलढाणा मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आमदार संजय गायकवाड यांच्यासमोरील आव्हाने चांगलीच वाढली आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून जयश्रीताई शेळके यांचे नाव अग्रक्रमावर आले होते. तसेच, त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात गावोगावी आपली यंत्रणा सक्रीय केली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. काल जयश्रीताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना एबी फार्म कुठे मिळाला? जागा काँग्रेसच घेणार आहे, अशी चर्चा मतदारसंघात निर्माण झाली होती. परंतु, कालच पक्षप्रवेशानंतर जयश्रीताईंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फार्मही दिला होता. त्या लवकरच आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्राने दिली आहे.
बुलढाण्यात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभेनंतर या मतदारसंघात काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु, ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेना (ठाकरे) पक्षात गेलेल्या जयश्रीताई शेळके यांनी उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ समर्थक कमालीचे चिडले असून, त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. बुलढाण्याची जागा काँग्रेसचीच आहे. या जागेचा तिढा महाआघाडी पातळीवर सुटलेला नसताना, शिवसेनेने त्यांच्या एबी फॉर्मचे वाटप केले. या जागेवरील दावा काँग्रेसने अद्याप सोडलेला नाही. प्रदेश नेतृत्व उद्या प्रस्ताव घेऊन दिल्लीत जाणार आहे. वेळप्रसंगी या मतदारसंघात पंजा व मशाल हे दोन्ही चिन्हे राहून मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेतही काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व देत आहेत.