खरी शिवसेना कोणती?; महाराष्ट्रच देणार फैसला!
- शिवसेना (ठाकरे) पक्षाची पहिली ६५ जणांची उमेदवारी यादी जाहीर
– मेहकरमधून सिद्धार्थ खरात हेच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार
– जयश्रीताई शेळके अखेर शिवसेनेत, लवकरच बुलढाण्यातून उमेदवारी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विधानसभा निवडणुकीतील ६५ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२३) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये १५ पैकी १४ विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्व. अनंत दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, शिंदे यांच्यासमोर केदार दिघे यांचे आव्हान असेल. याशिवाय, वरळीतून आदित्य ठाकरे हे उमेदवार आहेत. बहुचर्चित मेहकर मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनाच उमेदवारी मिळाली असून, बुलढाणा मतदारसंघातून जयश्री शेळके यांना लवकरच उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून रितसर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे पती तथा माजी अधिकारी सुनील शेळके हेदेखील उपस्थित होते. सिद्धार्थ खरात हे शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना तर जयश्री शेळके या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना टक्कर देणार आहेत. ही विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आतापर्यंत दोन्ही शिवसेना या आपणच खरी शिवसेना आहोत असा दावा करत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडीनंतर जनता कोणाच्या बाजूने आहे, हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे म्हटले जात आहे. याआधी महायुतीच्या तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेने आपली यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यातून माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी, ४० पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत ८५-८५-८५ असा फॉर्म्युला समोर आला असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर उर्वरित जागा या मित्रपक्षांसाठी देण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक पार पडली आणि आम्ही सर्वसंमतीने या फॉर्म्युल्यावर आलो आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ज्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्या ठिकाणीदेखील शिवसेनेने आपले उमेदवार दिले आहेत. त्याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले, की यादीत काही ‘करेक्शन्स’ आहेत. ते लवकरच समोर येतील. शिवसेनेच्या पहिल्या यादीनुसार, वरूण सरदेसाई, महेश सावंत, प्रवीणा मोरजकर, केदार दिघे, स्नेहल जगताप, समीर देसाई, सिद्धार्थ खरात, राजू शिंदे यांच्यासह जयश्री शेळके या नव्या चेहर्यांना संधी मिळाली आहे.
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी –
१. उन्मेष पाटील – चाळीसगांव
२. वैशाली सूर्यवंशी – पाचोरा
३. सिद्धार्थ खरात – मेहकर
४. नितीन देशमुख – बाळापूर
५. गोपाल दातकर – अकोला पूर्व
६. डॉ. सिद्धार्थ देवळे – वाशिम
७. सुनील खराटे – बडनेरा
८. विशाल खरवटे – रामटेक
९. संजय देरकर – वणी
१०. एकनाथ पवार – लोहा
११. डॉ. संतोष टारफे – कळमनुरी
१२. डॉ. राहुल पाटील – परभणी
१३. विशाल कदम- गंगाखेड
१४. सुरेश बनकर- सिल्लोड
१५. उदयसिंह राजपुत – कन्नड
१६. किशनचंद तनवाणी- संभाजीनगर मध्य
१७. राजू शिंदे- संभाजीनगर पश्चिम.
१८. दिनेश परदेशी- वैजापूर
१९. गणेश धावक- नांदगांव
२०. अद्वय हिरे- मालेगांव बाह्य
२१. अनिल कदम – निफाड
२२. वसंत गीते- नाशिक मध्य
२३. सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
२४. जयेद्र दुबळा – पालघर
२५. डॉ. विश्वास दळवी – बोईसर
२६. महादेव घाटक- भिवंडी ग्रामीण
२७. राजेश वानखेडे- अंबरनाथ
२८. दिनेश म्हात्रे – डोंबिवली
२९. सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
३०. नरेश मणेरा- ओवळा – माजिवाडा
३१. केदार दिघे – कोपरी – पाचपाखडी
३२. राजन विचारे – ठाणे
३३. एम.के. मधवी – ऐरोली
३४. उद्देश पाटकर – मागाठाणे
३५. सुनील राऊत – विक्रोळी
३६. रमेश कोरगांवकर – भांडुप पश्चिम
३७. अनंत नर – जोगेश्वरी पूर्व
३८. सुनील प्रभू – दिंडोशी
३९. समीर देसाई – गोरेगाव
४०. ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
४१. प्रकाश फतरपेकर – चेंबूर
४२. प्रविणा मोजरेकर – कुर्ला
४३. संजय पोतनीस – कलिना
४४. वरूण सरदेसाई – वांद्रे पूर्व
४५. महेश सावंत – माहीम
४६. आदित्य ठाकरे – वरळी
४७. नितीन सावंत – कर्जत
४८. मनोहर भोईर – उरण
४९. स्नेहल जगत्ााप – महाड
५०. शंकरराव गडाख – नेवासा
५१. बदामराव पंडित – गेवराई
५२. कैलास पाटील – धाराशीव
५३. राहुल मोटे पाटील – परांडा
५४. दिलीप सोपल – बार्शी
५५. अमर पाटील – सोलापूर दक्षिण
५६. दीपक साळुंखे – सांगोले
५७. हर्षद कदम – पाटण
५८. संजय कदम – दापोली
५९. भास्कर जाधव – गुहागर
६०. बाळ माने – रत्नागिरी
६१. राजन साळवी – राजापूर
६२. वैभव नाईक – कुडाळ
६३. राजन तेली – सावंतवाडी
६४. केपी पाटील – राधानगरी
६५. सत्यजित पाटील – शाहूवाडी
———