राज्यात ‘महाआघाडी’ सत्तेत परतण्याचे संकेत!
- 'इलेक्टोरल एज'च्या मेगा प्री-पोल सर्वेतील धक्कादायक निष्कर्ष!
– “महायुती”ला ११७ तर “महाआघाडी”ला १५७ जागा मिळण्याचा व्यक्त केला अंदाज
मुंबई (खास प्रतिनिधी) – ‘इलेक्ट्रोल एज’ने आपल्या मेगा प्री-पोल सर्वेतील धक्कादायक निष्कर्ष त्यांच्या सोशल मीडिया पेजवर जाहीर केले आहेत. त्यानुसार, राज्यात महाआघाडी सरकार सत्तेत परतण्याचे दाट संकेत प्राप्त झाले असून, महायुतीला अवघ्या ११७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. शरद पवार यांच्याशी बंडखोरी करून पक्ष ताब्यात घेणारे अजित पवार यांना बारामतीत त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी टफ फाईट चालवली असून, अजित पवार ४५ तर युगेंद्र पवार जिंकण्याचे ४७ टक्के चान्सेस सांगण्यात आले आहेत. सर्वाधिक ७९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, त्या खालोखाल ६८ जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ‘इलेक्ट्रोल एज’ या खासगी संस्थेने मेगा प्री-पोल सर्वे केला आहे. त्याचे निष्कर्ष त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर जाहीर केलेले आहेत. त्यानुसार, राज्यात महाआघाडी १५७ जागांसह सत्तेत परतण्याची शक्यता असून, त्यात ६८ जागा काँग्रेस, ४४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) ४१ जागा, सपा १, सीपीआय (एम) १ व पीडब्लूपी पक्षाला १ जागा मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर ‘महायुती’च्या हातातून सत्ता निसटण्याची दाट शक्यता व्यक्त करत, महायुतीला ११७ जागा मिळतील, त्यात भाजप सर्वाधिक ७९, शिवसेना (शिंदे गट) २३, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १४ व इतर एक अशा जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच अपक्ष व इतरांना १४ जागा मिळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे. २८८ जागांच्या या विधानसभेत बहुमतासाठी १४४ इतक्या जागा लागतात, त्यामुळे महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या मूडमध्ये जनमाणस असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र महाआघाडीला तारणार?
या प्री पोल सर्वेक्षणानुसार, विदर्भातील ६२ पैकी ३८ जागा महाआघाडीला तर १८ जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे, मराठवाड्यातील ४६ पैकी २७ जागा महाआघाडीला तर १८ जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे, पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी ४१ जागा महाआघाडीला तर २८ जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र येथे महायुतीला चांगले यश मिळण्याची शक्यता असून, मुंबईतील ३६ जागांपैकी २२ जागा महाआघाडीला तर १४ जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.