आ. संजय गायकवाडांना माजी मंत्री आ. शिंगणेंनीही नामोल्लेख टाळून फटकारले!
- माझ्यासाठी पक्ष महत्वाचा नाही, डॉ. शिंगणेंनी टाकली राजकीय गुगली!
– राजकारणात गलिच्छ भाषा वापरणार्यांना शासनाने एकदाच चांगली समज द्यावी : आ. डॉ. राजेंद्र शिंगणे
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राजकारणात गलिच्छवीरांची संख्या जास्त वाढली आहे. त्यांना शासनाने एकदाची चांगली समज द्यावी, अशा शब्दांत माजी मंत्री तथा सिंदखेडराजा-देऊळगावराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाज यांना त्यांचा नामोल्लेख टाळून फटकारले. मलकापूर पांग्रा येथील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच, माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा नसून तुम्ही महत्त्वाचे आहे. १९९५ साली अपक्ष निवडणूक लढविली असताना मला ३५ हजार मताधिक्याने निवडून दिले होते. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार यांची चिंता तुम्ही करु नका. मीही करीत नाही, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगून, राजकीय गुगली टाकली.
डॉ. शिंगणे म्हणाले, की महाराष्ट्र हा गांधी, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालत आहे. अलीकडच्या काळात राजकारणात गलिच्छ भाषेचा वापर जास्त केला जात आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात ही भाषा चालत नाही. याचा परिणाम समाजावर काय होईल, याचा विचार केला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन हा निर्णय चांगला आहे. दरवर्षी निवडणुकांमुळे वेळ आणि कामाला उशीर होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आज शासन धडाधड निर्णय घेऊन योजनांचा पाऊस पाडत आहे. सोयाबीन, कापूस यांचे भावही निश्चित केले आहे. सर्वकाही निर्णय तुमच्यासाठी आहेत. माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा नसून तुम्ही महत्त्वाचे आहे. १९९५ साली अपक्ष निवडणूक लढविली असताना मला ३५ हजार मताधिक्याने निवडून दिले होते. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार यांची चिंता तुम्ही करु नका. मीही करीत नाही. कारण पक्षापेक्षा तुम्ही मला महत्त्वाचे आहे.
आज भावी आमदार म्हणून सर्वच मतदारसंघात फिरत आहेत. मतदारसंघात गावे किती, तालुके किती, भौगोलिक क्षेत्रफळ किती, समस्या काय याची त्यांना माहिती नाही. ग्रामपंचायती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक न लढलेलेसुध्दा फिरत आहेत. असो हा त्यांचा प्रश्न आहे, अशा शब्दांत त्यांनी आमदारकीसाठी या मतदारसंघातून गुडघ्याला बाशिंग बासून बसलेल्या तरूण नेतृत्वाला त्यांनी फटकारले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हाजी गुलशेरखा पठाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, माजी सभापती जगणमामा सहाने, नाथाभाऊ दराडे, साहेबराव काटे महाराज, राजू इंगळे, अरुण वाघ, विलासराव देशमुख, विनायक राठोड, अभियंता विष्णू सोनुने, इरफान अली, सुरेश तुपकर, गजानन बंगाळे, सुधाकर शिंगणे, सुनील जगताप, सय्यद रफीक, कमलसेठ तापडिया, उमेश शेजूळ, विनोद मोगल, लालाराव देशमुख, भिकाजी तळेकर, कमलाकर गवई, यादवराव टाले, विठोबा शिंगणे, आदित्य काटे, अॅड. निशिकांत राजे जाधव, नकुल शिंगणे यांसह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, परिसरातील सरपंच, सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी केले.