शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मिळणार प्रकाश आंबेडकरांची साथ!
- बोलणी सुरू; बुलढाण्याची जागा जाहीर करण्याचे आंबेडकरांनी टाळले!
मुंबई/अकोला (खास प्रतिनिधी) – राजकीयदृष्ट्या शेतकरी नेते रविकांत तुपकर शांत वाटत असले तरी, ते मोठी राजकीय खेळी करण्याची तयारी करत आहेत. लोकसभेला तब्बल अडिच लाख मते घेणार्या तुपकरांसोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बोलणी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यामुळेच आंबेडकरांनी विधानसभेचे ११ उमेदवार जाहीर करताना, चिखली, बुलढाणाव व खामगाव मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुपकरांवर राजकीय कुरघोडी करत, तिसर्या आघाडीत बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे यांना सोबत घेण्याची खेळी केली. वास्तविक पाहाता, तुपकर व बच्चू कडू हे सोबत येणार होते. परंतु, बच्चू कडू यांनी तुपकरांऐवजी शेट्टी हा भिडू निवडला. त्यामुळे तिसर्या आघाडीत न गेलेल्या आंबेडकरांसोबत जाणे तुपकरांनी पसंत केले असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने तुपकर हे आंबेडकरांसाठी सुरक्षित मतदारसंघ असलेल्या बुलढाण्यातून आंबेडकरांच्या आघाडीचे उमेदवार असू शकतात, असेही राजकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत न जाता तिसरी आघाडी तयार केली आहे. त्यात, सुरूवातीला रविकांत तुपकरांसोबत येण्याची शक्यता असलेले बच्चू कडू हे शेट्टींसोबत गेले आहेत. शिवाय, त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे भोसले हेदेखील आहेत. त्यादृष्टीने पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसर्या आघाडीची घोषणा नुकतीच केली होती. या तिसर्या आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकर यांनी मात्र नकार दिला असून, त्यानंतर चौथ्या आघाडीसाठी आंबेडकर व तुपकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने या दोघांत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे. याच राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बुलढाणा, खामगाव व चिखली असे तीन विधानसभा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोयीस्कर राहील, असा प्रकाश आंबेडकर यांचा कयास आहे. कारण, २०१९च्या निवडणुकीत बुलढाण्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराज शिंदे यांनी तब्बल ४१ हजार ७१० मते घेतली होती, तर २०२४च्या लोकसभा मतदारसंघातून तुपकर हे या मतदारसंघातून जवळपास ३९ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाली तर या मतदारसंघातून रविकांत तुपकर हे किमान २५ ते ३० हजार मतांच्या फरकाने तिहेरी लढतीत हमखास निवडून येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दलित आणि ओबीसी हा वंचित आघाडीचा मतदार मानला जातो. तुपकर सोबत आल्यास शेतकर्यांचे मतदान वंचित आघाडीकडे वळू शकते. त्यामुळे आंबेडकर आणि तुपकर एकत्र आल्यास पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विधानसभा निवडणुकीची समिकरणे बदलू शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढूनदेखील प्रस्थापित उमेदवारांच्या नाकात दम आणला होता. त्यांनी तब्बल अडीच लाख मते घेतली. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाले. त्याचा फटका महाआघाडीच्या उमेदवाराला बसला व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर हे फार कमी फरकाने पराभूत झाले. बुलढाणा लोकसभा ंमतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना साडेतीन लाख, शिवसेना (ठाकरे) उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना ३ लाख २० हजार ३८८ मते पडली आहेत. प्रा.खेडेकर २९ हजार ४७९ मतांनी पराभूत झाले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा, बुलढाणा, चिखली व मेहकर या विधानसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मोठे मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे तुपकरांना आंबेडकरांची साथ मिळाली तर मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा या मतदारसंघासह विदर्भ व मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे राजकीय धुरिणांचे मत आहे.
—————-