विधानसभेच्या निवडणुका ठरल्यावेळीच; नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत; भाजपकडून निवडणुकीची रणनीती पूर्ण?
– महायुती व महाआघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात, लवकरच घोषणा!
मुंबई (खास प्रतिनिधी) – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाऊन शिंदे-फडणवीस-पवार असे तिघाडी सरकार निवडणुका पुढे लांबवू शकते, अशी राजकीय चर्चा रंगत असताना, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना या चर्चेला पूर्णविराम दिला. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात घेतली जाऊ शकते, असे सुतोवाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोण किती जागा लढविणार, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले. २८८ सदस्यीय राज्य विधानसभेसाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेतली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १.६० कोटी महिलांना लाभ मिळत आहे. ही योजना अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दुसरीकडे, महाविकास आघाडीसह महायुतीचे जागावाटप पूर्ण झाले असून, काही जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. तसेच, या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती पूर्ण झाली असून, मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातील नेते व कार्यकर्ते यांची फौज राज्यात येण्याची शक्यता आहे, असे राजकीय सूत्राने सांगितले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मेरिट आणि विजयाची क्षमता असणार्यांनाच उमेदवारी दिली जाईल, हा महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला असेल. महायुतीतील जागावाटप येत्या ८ ते १० दिवसांत अंतिम होईल. अद्याप निवडणुकीच्या तारखांची घोषणा आयोगाने केली नाही. कदाचित नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात २ टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडेल. विजयाची क्षमता आणि चांगला स्ट्राईक रेट यावरच तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप होईल. आमच्या महायुती सरकारला महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जवळपास १.६ कोटी महिलांना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अर्थसहाय्य मिळत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आम्हाला २.५ कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहचवायचा आहे. आमचे सरकार हे सर्वसामान्यांसाठी आहे. महायुती सरकार राज्यात विकास आणि लोककल्याणकारी योजना यात समतोल साधत आहे. आमच्या सरकारचे मुंबईला झोपडपट्टीमुक्त बनवून सर्वांना परवडणार्या किंमतीत घरे देण्याचे उद्दिष्टे आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँगे्रसचा समावेश असलेले महायुतीचे सरकार सातत्याने विकास आणि कल्याणकारी योजनांवर काम करीत आहे आणि या योजनांना राज्यातील जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आम्ही जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. यासाठी गुणवत्ता आणि विजयाची खात्री हा महत्त्वाचा असणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांचा महायुतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. माझे सरकार सर्वसामान्यांचे आहे. विकास आणि कल्याणकारी योजना यात आम्ही अचूक समतोल साधला आहे. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून आमच्या सरकारने दीड लाख युवकांना नियुक्तिपत्रे दिली असून, त्या अंतर्गत त्यांना ६, १० हजार स्टायपंड दिले जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १० लाख युवकांना समाविष्ट करण्यावर आमचा भर असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.