शेंदुर्जन येथील रस्त्याचे काम निकृष्ट, कामात मोठा भ्रष्टाचार!
- काँग्रेस, शिवसेना नेत्यांची थेट बांधकाम विभागाच्या सचिवांकडे लेखी तक्रार
– रस्त्याच्या मधोमध पोल तसेच ठेवले; नाली बांधकामही अर्धवट; वरचेवर खडी पसरवून बोगस काम सुरू!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील शेंदुर्जन येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे होत असून, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याबाबत बुलढाणा कार्यकारी अभित्यांकडे लेखी तक्रार केली होती. परंतु, ते संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. या कामाचा फलकदेखील लावला गेला नसून, अधिकारी हे ठेकेदाराशी मिलीभगत करून असल्याने रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन सुरू आहे. या कामाची तातडीने शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, तसेच सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीसह शिवसेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग शिंगणे व शिवसेनेचे स्थानिक नेते दामूअण्णा शिंगणे यांनी सविस्तर निवेदनच सादर केलेले आहे.
मौजे शेंदुर्जन (ता.सिंदखेडराजा) येथे सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत रस्ता रूंदीकरण आणि मजबुतीकरण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूला पहिले इलेक्ट्रिक खांब होते ते इलेक्ट्रिक खांब जसेच्या तसेच आहेत व ते मधोमध असतांना सदर रस्त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच सदर कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम होणे आवश्यक आहे. परंतु, तसे होत नाही. रस्ता खोदून, खडी पसरवून, डबई करणे आवश्यक असतांना वरचेवर खडी आथरून कडे टाकणे सुरु आहे. सिमेंटचे प्रमाण योग्य प्रमाणात नाही. सदर रस्त्यामध्ये स्टीलचा वापर कुठेच झालेला नाही. तसेच, रस्त्याच्या एका बाजूला अर्ध्यापर्यंत नालीचे बांधकाम केले असून, दुसरी बाजूला नालीचे बांधकाम केले नाही. पहिली बाजूसुद्धा अर्धी बाकी आहे. या सर्व गंभीर बाबी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्याच्या निदर्शनास आणून दिल्या असता, कामात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या निकृष्टदर्जाच्या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी. तसेच, बांधकामाच्या ठिकाणी बांधकामाचा फलक लावलेला नाही. फलक लावून त्यावर कामाची किंमत, दोषदायित्व करण्याबाबतीत ठेकेदाराचे नाव, रस्ता कोणत्या निधीचा आहे, त्याची माहिती असलेला बोर्ड लावणे आवश्यक असतांना, तसे न होता वारंवार फोन करूनसुद्धा फलक लावलेला नाही. याबाबत कार्यकारी अभियंता बुलढाणा सुभाष राऊत यांच्याकडे लेखीस्वरूपात तक्रारकेली असता, ते कंत्राटदाराच्या बाजूने बोलतात व अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरु आहे असे सांगतात. आणि, उडवाउडवीचे उत्तर देतात. कामावरसुद्धा येऊन पाहत नाही. तेव्हा या निकृष्ट व दर्जाहीन कामाची शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी तालुका काँग्रेससह शिवसेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली आहे. अन्यथा, काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आलेला आहे.