भाजपने जागा राखल्या, शिंदे गटाने एक जागा गमावली!
सिंदखेडराजात मनोज कायंदे ठरले "जायंट किलर"; डॉ. राजेंद्र शिंगणेंना धूळ चारली
– मेहकरात डॉ. संजय रायमुलकरांची हॅटट्रीक हुकली, सिद्धार्थ खरात यांना विजयाची लॉटरी!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – संपूर्ण राज्यात महायुतीचा विजयाचा वारू चौफेर उधळला असताना मेहकर विधानसभा मतदारसंघाची जागा वगळता सर्व मतदारसंघात महायुतीनेच शानदार विजय प्राप्त केला आहे. महायुती सरकारविरोधात शेतकरी व विकासाच्या मुद्द्यावर जहरी प्रचार करणार्यांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला आहे. भाजपने आपल्या तीनही जागा राखत उलट मलकापुरात विजय प्राप्त केला आहे. तर शिंदे गटाला बुलढाण्यात निसटता विजय मिळाला असून, मेहकरात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर सिंदखेडराजात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज देवानंद कायंदे यांनी पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पराभवाची धूळ चारली आहे. या मतदारसंघात नवखे मनोज कायंदे हे जायंट किलर ठरले आहेत. तर शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चिखलीत भाजपच्या नेत्या व विद्यमान आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांना पुन्हा एकदा धूळ चारली आहे. खामगावमधूव आकाश फुंडकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांना धूळ चारली असून, मलकापुरात चैनसुख संचेती यांनी विजय प्राप्त करून काँग्रेसच्या ताब्यातून पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला. तर जळगाव जामोद हा मतदारसंघ भाजपने कायम राखत येथून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू डॉ. संजय कुटे हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. येत्या २५ तारखेला राज्यात महायुती सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता पाहाता, श्वेताताई महाले किंवा संजय कुटे यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बहुचर्चित बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेना (ठाकरे) पक्षात येऊन उमेदवारी पदरात पाडून घेणार्या जयश्री शेळके यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्याशी अत्यंत चुरशीची लढत दिली. त्यामुळे संजय गायकवाड यांचा अगदी निसटसा असा ८४१ मतांनी विजय होऊ शकला. गायकवाड यांना ९१ हजार ६६० तर जयश्री शेळके यांना ९० हजार ८१९ मते पडलीत. मेहकर मतदारसंघात डॉ. संजय रायमुलकर यांना अॅण्टी इन्कबन्सीचा जोरदार फटका बसला. त्यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. ऋतुजा चव्हाण व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सिद्धार्थ खरात यांनी या निवडणुकीत जोरदार रान उठवले होते. त्यामुळे विजयाची शक्यता नसल्याने व मतांचे विभाजन टाळण्यासाठी मतदारांनी ऋतुजा चव्हाण यांना मते न देता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना मते दिली. मेहकर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, त्याचा फटका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना लोकसभेलादेखील बसला होता. उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती मतांत परावर्तीत होऊन येथे सिद्धार्थ खरात हे तब्बल ४ हजार ८१९ मतांनी विजयी होऊ शकले. खरात यांना एक लाख ४ हजार २४१ तर डॉ. संजय रायमुलकर यांना ९९ हजार ४२३ मते मिळाली. या पराभवाने संजय रायमुलकर यांची चौथ्यांदा विजयाची हॅटट्रीक मात्र हुकली आहे.
सिंदखेडराजात महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. येथे शिंदे गट व अजित पवार गट असे दोन्हीही उमेदवार मैदानात होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या गायत्री शिंगणे यांनीदेखील बंडखोरी केली होती. परंतु, मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांच्यात पदरात मतांचे दान टाकले असून, त्यांना ४ हजार ६५० मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवले आहे. गेली ३० वर्षे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करून मनोज कायंदे हे जायंट किलर ठरले आहेत. मनोज कायंदे यांना ७३ हजार ४१३ तर डॉ. शिंगणे यांना ६८ हजार ७६३ इतकी मते पडली आहेत. तर शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर यांना ६० हजार ६३५ इतकी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या सविताताई मुंढे यांना १६ हजार ६५६ इतके मते मिळालीत. चिखली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनीच अपेक्षेप्रमाणे विजय संपादन केला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांचा ३ हजार २०१ मतांनी पराभव केला आहे. श्वेताताईंना एक लाख ९ हजार २१२ मते तर राहुल बोंद्रे यांना एक लाख ६ हजार ११ इतकी मते मिळालीत. खामगावात फुंडकर व सानंदा या परंपरागत लढतीत भाजपचे अॅड. आकाश फुंडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात फुंडकर यांना एक लाख १० हजार ५९९ तर दिलीपकुमार सानंदा यांना ८५ हजार १२२ इतकी मते मिळाली आहेत. सानंदा यांचा तब्बल २५ हजार ४७७ इतक्या मतांनी पराभव झालेला आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराव हिवाळे यांनी २६ हजार ४८२ इतकी मते घेऊन ते तिसर्या क्रमांकावर राहिले आहेत. जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा १८ हजार ७७१ मतांनी पराभव केला आहे. डॉ. कुटे यांना एक लाख ७ हजार ३१८ तर स्वाती वाकेकर यांना ८८ हजार ५४७ इतकी मते मिळालीत. तर काँग्रेसच्या ताब्यात गेलेला मलकापूर मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपने आपल्या ताब्यात घेतला असून, येथून भाजपचे चैनसुख संचेती हे एक लाख ९ हजार ९२१ मतांनी विजयी झाले आहेत. तर त्यांनी काँग्रेसचे राजेश एकडे यांचा २६ हजार ३९७ मतांनी पराभव केला आहे. एकडे यांना ८३ हजार ५२४ इतकी मते मिळाली. तर येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. मोहम्मद सबीरोद्दीन यांना ९ हजार ३१६ इतकी मते पडली आहेत.
———————