AalandiAURANGABADBreaking newsBuldanaBULDHANADehuDhuleGadchiroliHead linesKhamgaonMaharashtraPolitical NewsPolitics

त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!

- मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका; शरद पवार कामाला लागले, निवडून येताच तातडीने मुंबई गाठण्याचे उमेदवारांना आदेश

– मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल्स बुक; ‘महाआघाडी’सह ‘महायुती’नेही घेतली खबरदारी!

मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यातील महायुती व महाआघाडीच्या अंतर्गत सर्वेक्षण तसेच जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलमधून त्रिशंकु विधानसभेचे चित्र समोर येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपआपले निवडून येणारे आमदार जपण्याची जोरदार तयारी चालवली आहे. तसेच, महाआघाडी व महायुतीने सरकार बनविण्यासाठी प्लॅन ए व प्लॅन बीदेखील तयार ठेवले आहे. त्यासाठी महाआघाडीची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. तसेच, महायुतीच्या नेत्यांनीदेखील यासंदर्भातील आपल्या स्तरावरील नियोजन केले असून, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व राज्यातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, सध्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत असल्याने त्याच्याआतच नवी १५वी विधानसभेची स्थापना करणे आवश्यक असणार आहे. विधानसभेच्या मतदानानंतर आता उद्या, शनिवारी (दि.२३) जनतेचा पैâसला उघड होणार असून, मतमोजणीची सर्व तयारी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण केलेली आहे.

महाआघाडीचे स्टेअरिंग जयंत पाटलांच्या हाती. एकाच गाडीतून सर्व नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना.

उद्याचा निकाल हाती आल्याआल्या विजयाचे प्रमाणपत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या सर्व विजयी आमदारांना तातडीने मुंबईत येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महायुती व महाआघाडीने काठावरचे बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी ‘बी प्लॅन’ची तयारीदेखील करून ठेवलेली आहे. विजयी झालेले बंडखोर व गळाला लागणार्‍या अपक्ष आमदारांनाही चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपने सॉफिटेल हॉटेल, उद्धवसेनेने ग्रँड हयात तर काँग्रेसने रेनिसन्स हॉटेलमधील खोल्या बुक करून ठेवल्याची माहिती आहे. उद्या काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर तसा धोका होऊ नये म्हणून पक्षाने काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात विशेष विमानाने आमदारांना नेण्याची तयारी केली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गेल्या ३० वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल ६१ टक्के मतदान झाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. अंतिम आकडेवारीनुसार, यंदा राज्यभरात सरासरी ६६.०५ टक्के मतदान झाले. हे वाढलेले मतदान कोणासाठी फायदेशीर ठरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
साधारणत: एखाद्या निवडणुकीत मतदानचा टक्का वाढल्यास तो प्रस्थापितविरोधी कल मानला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात वाढलेले मतदान हे लाडकी बहीण योजनेचे यश असल्याचा दावा सत्ताधारी महायुतीकडून केला जात आहे. उद्या, शनिवारी सकाळी ८ वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातदेखील जोरदार हालचाली सुरू असल्याचे आज दिसून आले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षाची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झाले, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी-१७ फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणीवेळी आपल्यासमोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. निकालाचे प्रमाणपत्र घ्या आणि थेट मुंबई गाठा असेही या बैठकीत सांगण्यात आले. या आदेशांच्या धर्तीवर आता पुढील राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे. दुसरीकडे, महाआघाडीच्या नेत्यांचीही महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेते हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. तेथे राज्यात निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.


एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारातही महायुतीलाच कौल देण्यात आला आहे. फलोदी सट्टाबाजारात भाजप आणि मित्रपक्षांना १४० ते १४२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, महाविकास आघाडीला १२८ ते १३० जागा मिळण्याची शक्यत आहे. फलोदी सट्टा बाजारात महायुतीला ४० पैसे भाव तर, मविआला २ ते २.५० रूपये भाव मिळत असून, सट्टा बाजाराच्या अंदाजाने अनेक दिग्गजांना घाम फुटल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!