– सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरूवात
– पोलिसांचा चोख बंदोबस्त; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगांव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबररोजी मतदान झाले असून, आता मतमोजणी उद्या दि. २३ नोव्हेंबररोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, प्रचंड पोलीस बंदोबस्तात होणार्या मतमोजणीतून सात विधानसभेच्या ११५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल असणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोण निवडून येणार? याबाबत अनेक पैजी, चर्चा झडत आहेत. त्याचा पैâसला उद्या येणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, खामगाव येथील लढती लक्ष्यवेधी धरल्या असून, या मतदारसंघातील निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहेत.
मतमोजणी ठिकाण याप्रमाणे : २१-मलकापूर विधानसभा येथील मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, बेलाड यार्ड मलकापूर, २२-बुलढाणा विधानसभा येथील मतमोजणी निवडणूक विभाग इमारत, तहसील चौक मागे बुलढाणा, २३-चिखली विधानसभा येथील मतमोजणी तालुका क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल चिखली, २४-सिंदखेडा राज विधानसभा येथील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार सहकार गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर सिंदखेडराजा, २५-मेहकर विधानसभा येथील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्रमांक ५ मेहकर, २६-खामगांव विधानसभा येथील मतमोजणी सरस्वती विद्या मंदिर हॉल खामगाव, २७- जळगाव जामोद विधानसभा येथील मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत जळगाव जामोद येथे होणार आहे.
मतमोजणीच्या फेर्या याप्रमाणे : विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून, मतदारांच्या संख्येनुसार फेर्या होणार आहेत. यात मलकापूर २२ फेर्या, बुलढाणा फेर्या २४, चिखली २३ फेर्या, सिंदखेडराजा २५ फेर्या, मेहकर २५ फेर्या, खामगांव २३ फेर्या व जळगाव जामोद २३ फेर्या होतील. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरूवात होईल. मतमोजणीसाठी सातही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक कोतवाल, मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी : मलकापूर विधानसभा मतदारसंघात ७१.१७, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ६२.३९, चिखली विधानसभा मतदारसंघात ७२.०७, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ७०.२२, मेहकर विधानसभा मतदारसंघात ६८.९७, खामगांव विधानसभा मतदारसंघात ७६.०६, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात ७३.५४ असे एकूण ७०.६० टक्के अंतिम सरासरी मतदान झाले. २१ लक्ष ३४ हजार ५०० मतदारापैकी १५ लक्ष ६ हजार ९२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७ लक्ष ९१ हजार ८७ पुरुष, ७ लक्ष १५ हजार ८२२ महिला तर १६ तृतीयपंथीय मतदरांनी मतदान केले.