डॉ. संजय कुटे पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये; विजयाची शक्यता असलेल्या अपक्षांवर ठेवणार नजर!
- राज्यात महायुतीचे सरकार बनविण्यात पुन्हा एकदा उचलणार महत्वपूर्ण वाटा!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाआघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार पाडून राज्यात महायुतीचे सरकार आणण्यात महत्वपूर्ण वाटा उचलणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी डॉ. संजय कुटे यांच्यावर फडणवीस यांनी पुन्हा एकदा महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. राज्यात त्रिशंकु विधानसभेची स्थिती पाहाता, जे अपक्ष व छोट्या पक्षाचे आमदार निवडून येऊ शकतात, त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्याची जबाबदारी डॉ. कुटे यांच्यावर सोपवली गेली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. महायुती बहुमतापासून दूर राहिल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार ठेवला असून, अपक्ष आणि बंडखोरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या राज्य नेतृत्त्वाने डॉ. कुटे यांच्यासह सहा नेत्यांवर दिली आहे. विशेष म्हणजे, या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या नेत्यांवर सोपविण्यात आली असून, हे सर्व नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यात जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, नीतेश राणे, निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांचा समावेश आहे. डॉ. संजय कुटे हे विद्यमान उमेदवारदेखील असून, जळगाव जामोदमधून ते विजयी होतील, अशी खात्रीदेखील पक्षाला आहे. चिखली व जळगाव जामोदच्या भाजपच्या जागा खात्रीने निवडून येतील, असे खात्रीशीर सूत्रांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता असलेले अपक्ष व बंडखोरांवर करडी नजर ठेवली जात असून, भाजपने त्यापैकी काहीशी संपर्कदेखील साधला आहे. यानिमित्ताने राज्यात सरकार स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस हे जोरदार फिल्डिंग लावताना दिसत आहेत.