BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

बुलढाणा मतदारसंघ ताकदीने लढविणार हे तुपकरांनी सांगितले; पण स्वतः कुठून लढणार हे सांगायचे टाळले!

- बुलढाण्यातून तुपकरविरूद्ध संजय गायकवाड 'सामना' रंगण्याची चिन्हे!

– लोकसभेची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अजूनही तुपकरांबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज; नाही तर बुलढाण्यात हरणार!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – लोकसभेला जे झाले त्याची पुनर्रावृत्ती बुलढाणा विधानसभा मतदारसंघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले असून, मोताळा तालुक्यातील राजूर येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीत त्यांना बुलढाण्यातून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे. बुलढाण्यातून जोरदार लढू, आणि जिंकू, असा विश्वास तुपकरांनी व्यक्त केला असून, ते स्वतः उमेदवार राहतील की नाही? याबाबत त्यांनी गौप्यता पाळली असली तरी, तुपकर हेच बुलढाण्यातून लढतील, आणि मोठ्या मताधिक्क्याने जिंकतील, असा विश्वास त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करत आहेत. सद्या बुलढाण्यातून दहशतीचे वातावरण संपविण्यासाठी सर्वपक्षीय मतौक्य झाले असून, त्याचा फायदा तुपकरांना होऊ शकतो. तर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुलढाण्याची जागा हातातून जाऊ द्यायची नसेल, तर त्यांनी अजूनही तुपकरांना संधी देण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असाही राजकीय सूर या मतदारसंघात आहेत. जालिंधर बुधवत हे या मतदारसंघातून जिंकून येण्याची सूतराम शक्यता नाही, असेही येथे चर्चिले जात आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मोताळा तालुक्यातील राजूर येथे पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुपकर यांनी प्रथमच बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. यावेळी मोताळा व बुलढाणा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत प्रथमतः लोकसभा निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. लोकसभा निवडणुकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आपली परिस्थिती अत्यंत चांगली होती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जवळपास ३९ हजार मते आपल्याला अपक्ष असतांनाही मिळाली आहे. कोणतीही बॅनरबाजी नाही, प्रचाराचे पुरेपूर साहित्य नाही, वाहने नाही, पैसे नाहीत, असे असतांनाही घरच्या भाकरी खाऊन कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली. कोणता नेता नाही, की पाठीराखा नाही, केवळ रविकांत तुपकर या एका चेहर्‍याकडे पाहून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जवळपास ३९ हजार मते देऊन मोठा विश्वास दर्शविला आहे. ही परिस्थिती पाहता, बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी यावेळी पदाधिकार्‍यांनी रेटून धरली. जवळपास सर्वच पदाधिकार्‍यांच्या भावना आणि मागणी एक समान दिसून आली. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भावनांचा तुपकर यांना गांभीर्याने विचार करावा लागला. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, सत्ता, संपत्ती आणि बळाचा वापर करून आपल्याला तोडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला, त्याचा अनुभव अनेक आंदोलनांमध्ये आलाच शिवाय लोकसभा निवडणुकीतदेखील आला. परंतु कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि सर्वसामान्य जनतेचा भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद हीच माझी संपत्ती आणि हीच माझी खरी ताकद ठरली. शेतकर्‍यांसाठी व चळवळीसाठी जीवाची बाजी लावून लढणार्‍या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तब्बल अडीच लाख मते देऊन सर्वसामान्य जनतेने आपली ताकद दाखविली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी तन-मन-धनाने जीवाची बाजी लावून घेतलेली मेहनतच आज मला लढण्याचे बळ देत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवू असे, रविकांत तुपकर यांनी सांगितले. तुपकरांच्या या घोषणेचे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी रविकांत तुपकर यांनी लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असला तरी आपण स्वतः बुलढाण्यातून मैदानात उतरू, असे तुपकरांना जाहीर केले नाही. आपण कुठून लढणार याबाबत तुपकर हे कमालीची गौप्यता पाळत आहेत. हा मुद्दा मुद्दामहून ‘सस्पेन्स’ ठेवण्याचा त्यांचा इरादा असावा. परंतु, त्यामुळे लोकांचे त्यांच्यातील स्वारस्य संपत आहे, हे तुपकरांच्या लक्षात येत नाही. ‘खरोखर लांडगा आला तरी लोकं येत नाही’, या गोष्टीची तुपकरांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील वातावरण तुपकरांसाठी अनुकूल असून, येथून ते एक तर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, किंवा शिवसेना (ठाकरे) पक्षाचा उमेदवार तरी मोठ्या मताधिक्क्याने पाडतील. सद्या या मतदारसंघात प्रचंड दहशतीचे वातावरण असून, ही दहशत मोडीत काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत. त्याचा फायदा तुपकरांना होऊ शकतो, जालिंधर बुधवत यांना नाही. बुलढाणा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, येथे काँग्रेसचा विचार चालतो. परंतु, अलीकडे या मतदारसंघाला राज्य व देशपातळीवर वारंवार खाली मान घालावी लागली आहे. केवळ विकासाचा बागुलबुवा उभा केला गेल्यानेही शहरी जनमाणस कमालीचे नाराज आहे. जातीय, धार्मिक, व राजकीय असे सर्वच फॅक्टर तुपकरांसाठी अनुकूल असून, लोकसभेला सर्व परिस्थिती प्रतिकूल असतानाही तुपकरांना येथून ३९ हजारांचा लीड मिळालेला आहे. त्यामुळे तुपकरांनी विनाकारण स्वतःविषयी सस्पेन्स न वाढविता, बुलढाण्यातून आपली उमेदवारी जाहीर करण्याची गरज आहे. तसेच, शिवसेना (ठाकरे) पक्षाला या मतदारसंघातून खरेच त्यांचा ‘गद्दार’ पाडायचा असेल तर त्यांनी रविकांत तुपकरांपुढे दोस्तीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. तुपकर आणि संजय गायकवाड यांच्या लढतीत सद्या ठाकरे यांनी प्रमोट केलेले उमेदवार जालिंधर बुधवत हे कुठेही टिकू शकत नाहीत, अशी येथील चर्चा आहे, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. तुपकर आणि गायकवाड अशी सरळ सरळ लढत झाली तर तुपकर हे जिंकतील. पण, तुपकर, गायकवाड आणि बुधवत अशी तिहेरी लढत झाली तर मात्र गायकवाड हे जिंकू शकतात, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

अंगावर याल तर शिंगावर घेवू – तुपकर

जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी पक्षातील नेते आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव वाढवीत असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात आहे, शिवाय धमक्या देऊन दादागिरीदेखील केली जात असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. परंतु आम्हीही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज खपवून घेणार नाही, कुणीही अंगावर आले तर बिनधास्त शिंगावर घेवू, आम्ही शेतकर्‍यांचे बच्चे आहोत, लक्षात ठेवा, असा सज्जड इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

विधानसभेच्या निवडणुका ठरल्यावेळीच; नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!