वाचाळवीर संजय गायकवाडांना अटक करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दौर्यावेळी तीव्र आंदोलन, एकएक कार्यकर्ता घराबाहेर पडेल!
- काँग्रेसने राज्य सरकारला ठणकावले; तब्बल चार तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर आ. गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल
– राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून आ. गायकवाडांचा स्वस्तात प्रसिद्धी लाटण्याचा डाव काँग्रेसने उधळला!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – देशातील आरक्षण संपविण्याचा भाजप व आरएसएसचा एजेंडा उघड करून बहुजन समाजाच्या घटनादत्त आरक्षणासाठी छातीचा कोट करून देश पातळीवर लढा उभा करणारे काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ हासडणार्यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर करून देश पातळीवर स्वस्तात प्रसिद्धी लाटण्याचा अश्लाघ्य प्रयत्न आ. संजय गायकवाड यांनी आज केला असता, तो काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी जोरदार आंदोलन करून हाणून पाडला. मुळात राहुल गांधी यांच्या विदेशातील भाषणाची चुकीची व अर्धवट क्लीप व्हायरल करून, व त्यांचे भाषण तोडून मोडून दाखविण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधक सपशेल तोंडघशी पडले होते. तरीदेखील आ. गायकवाड यांनी त्या चुकीच्या क्लीपच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केले होते. बुलढाणा पोलिसांनी आ. गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर तब्बल चार तासांचे आपले ठिय्या आंदोलन काँग्रेसने मागे घेतले. आ. गायकवाडांना अटक करा, नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौर्यावेळी तीव्र आंदोलन करू, आमचा प्रत्येक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यापासून भाजपनं स्वत:ला लांब ठेवलं आहे. या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
‘राहुल गांधींची जीभ कापून देणार्यास ११ लाखांचे बक्षीस देऊ’, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काँग्रेसह सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. देशाच्या विरोधी पक्षनेत्याविरोधात असे विधान केल्यामुळे देशभरातून टीकेचा सूर उमटला होता. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आ. गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी भूमिका घेत, बुलढाणा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तब्बल चार तासांपेक्षा अधिक तास ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत, काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला. एफआयआरची कॉपी हातात घेऊन मध्यप्रदेशचे माजी आमदार तसेच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबविले. कलम ३५१(२,३,४) तसेच १९२ अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादी म्हणून समाधान पुंडलिक दामधर रा. जामोद, ता. जळगांव जामोद यांचे नाव आहे. ‘गुन्हा दाखल झाला आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या दिवशी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल’, असा इशारा काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
आ. गायकवाड यांचे स्वतःच्या जिभेवर नियंत्रण नाही, असा लोकप्रतिनिधी राहुलजी गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा करतो, ही निंदनीय बाब आहे. माणसाने बोलून विचारात पडल्यापेक्षा विचार करून बोलले पाहिजे, अशा वादग्रस्त प्रवृत्तीच्या लोकांना विधानसभेत पाठविणार्या लोकांनासुद्धा आता पच्छातापाची वेळ आली आहे. हा निव्वळ राहुलजी गांधी यांचा अवमान नव्हे तर भारतीय संविधानाचासुध्दा अवमान आहे. आ.संजय गायकवाड हे नेहमीचं बेताल वक्तव्य करुन प्रसिध्दी माध्यमातून चर्चेत राहतात. मात्र, तोंडावर नियंत्रण नसणारे लोकप्रतिनिधी प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करतात हे स्पष्ट करण्याची गरज नाही. प्रसिध्दी मिळविणे सोप्पं असले तरी लोकप्रियता मिळवता येत नाही, अशा बेताल लोकप्रतिनिधीचा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार नक्की हिशोब घेतील, अशी टीकाही काँग्रेस नेत्यांनी याप्रसंगी केली.
संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी सत्ताधार्यांवर टीकेची झोड उठवली होती. ‘संजय गायकवाड यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर केली जायला हवी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. येत्या काळात महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असं वडेट्टीवार म्हणाले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या या वाचाळवीर आमदाराला आवरावे, अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.
—————