चिखली (तालुका प्रतिनिधी) – ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका सरचिटणीस तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ व ‘दैनिक दिव्यछाया’चे तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे हे चिखली पंचायत समिती येथे पळसखेड दौलत येथील एका तक्रारअर्जप्रकरणी माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथील जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी डी. डी. काळे याने त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच उलट पत्रकाराशी अतिशय उद्धटपणे वागून म्हंटले की, मी जिल्हा माहिती अधिकार्यांकडे तक्रार करेन, अशी धमकी दिली. आणि, ‘देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे माझे नातेवाईक आहेत, पत्रकार सिद्धेश्वर पवार हेदेखील माझे नातेवाईक आहेत, राजेंद्र काळे हे माझे मित्र आहेत, त्यामुळे माझे कुणी काहीच वाकडे करू शकत नाही’, अशा शब्दांत काळे याने पत्रकारांशी अरेरावी केली. दरम्यान, काळे यांच्या या वर्तवणुकीचा तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून तीव्र निषेध व्यक्त केल्या जात असून, लवकरच गटविकास अधिकारी, आ. श्वेताताई महाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देखील रितसर तक्रार केली जाणार आहे, अशी माहिती ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज’शी बोलताना दिली आहे.
सविस्तर असे की ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ तथा दैनिक दिव्यछायाचे चिखली तालुका प्रतिनिधी (पत्रकार) महेंद्र हिवाळे हे एका बातमीच्या अनुषंगाने आपल्या कर्तव्यकामी चिखली पंचायत समिती येथे पळसखेड दौलत येथील एका तक्रार अर्जासंबंधी माहिती घेण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे गटविकास अधिकारी तसेच इतरही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने कार्यालयातील एक जबाबदार अधिकारी म्हणून जनमाहिती अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी डी. डी. काळे याच्याकडे माहिती घेण्यासाठी गेले असता, काळे याने पत्रकार हिवाळे यांना उद्धटपणाची वागणूक दिली. इतकेच नाही तर अगदी बावळटसारखी विधाने केली. ”मी उडदाची डाळ खाऊन आलो आहे, मला माहिती विचारू नका. मी चिखलीत लहानचा मोठा झालो. प्रकाश पोहरे, सिद्धेश्वर पवार हे माझे जवळचे नातेवाईक आहेत. राजेंद्र काळे हे माझे मित्र आहेत”. अशी निव्वळ हास्यास्पद विधाने त्याने केली व मूळ माहिती देण्यास टाळाटाळ केली.
यावेळी पत्रकार हिवाळे यांनी तेथेच व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले असता, कुणाच्या विचारून रेकॉर्डिंग केले, पोलिसांना बोलावून जेलमध्ये टाकीन, अशी धमकीही त्याने दिली. पत्रकारच काय पण सर्वसामान्य माणूसही सरकारी कार्यालयात रेकॉर्डिंग/शुटिंग करू शकतो, असे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, याची त्यांना जाणीव करून दिली असता, त्यांनी आपला उर्मटपणा आणखी वाढवला, व मी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तुझी तक्रार करेन, अशी निष्फळ धमकीही दिली. जनमाहिती अधिकारी काळे याच्या कर्तव्यशून्य व बेकायदेशीर वागणुकीबद्दल पत्रकार महेंद्र हिवाळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादक बाळू वानखेडे यांनादेखील माहिती दिली, तसेच ग्रामीण पत्रकार संघटनेलाही कळवले. या घटनेचा आणि असले बेजबाबदार अधिकारी चिखली पंचायत समिती कार्यालयात ठेवू नये, त्यांची तातडीने चिखली बाहेर बदली करावी, अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली असून, याबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच सविस्तर तक्रार दाखल केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्याआधी स्थानिक असलेल्या काळे यांची बदली करावी, अशी मागणी पत्रकार करत आहेत.
राजेंद्र काळे, सिद्धेश्वर पवार यांचे नाव घेतले पण दोघेही काळेला ओळखत नाहीत!
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे व सिद्धेश्वर पवार हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मार्गदर्शक आहेत, या दोघांचेही नाव काळे यांनी घेतले असले तरी, हे दोघेही काळे याला ओळखत नसून, तो काळा आहे की गोरा हेदेखील आपल्याला माहिती नाही, असे या दोघांनीही सांगितले आहे. त्यामुळे पत्रकारांना दमदाटी करणार्या डी डी काळे याच्यावर तातडीने कारवाईची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे.