सत्तेवर आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करणार!
- उद्धव ठाकरे यांचे राज्य सरकारी कर्मचार्यांना शिर्डीतील महाअधिवेशनात वचन
– जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचार्यांची अभूतपूर्व एकजूट
शिर्डी (विशेष प्रतिनिधी) – राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यास पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्यातील कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना (ओपीएस) जशाच्या तशी लागू करण्यात येईल, असे वचन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल (दि.१५) शिर्डी येथे झालेल्या पेन्शन महाअधिवेशनादरम्यान राज्य सरकारी कर्मचार्यांना दिले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील उपस्थित होते. राज्यातील महाभ्रष्ट सरकार व केंद्रातील मोदी सरकार तुम्हाला कधीच जुनी पेन्शन योजना देणार नाही, ती धमक आणि नियत फक्त शिवसेना (ठाकरे) पक्षातच आहे, असेही त्यांनी नीक्षून सांगितले.
राज्यात काल (दि.१५) शिर्डी येथे महाअधिवेशन झाले. यावेळी राज्यातील सर्वच जिल्ह्यातून लाखो राज्य सरकारी कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होत्या. कर्मचार्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन हवी आहे. कारण नवीन पेन्शन योजनांमध्ये तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना असो, की युनिफाईड पेन्शन असो या पेन्शन योजनांमध्ये कर्मचार्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन अथवा इतर भत्ते दिले जात नाहीत. तसेच नवीन पेन्शन योजनांमध्ये कर्मचार्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे कर्मचार्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये फायदा होत नाहीत. यामुळे कर्मचार्यांकडून जुनी पेन्शन करीता सन २००५ पासून वेळोवेळी आंदोलने, मोर्चा काढून आपली मागणी मान्य करुन घेण्यासाठी लढा देत आहेत.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी शिर्डी येथील राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महाअधिवेशनात ठराव घेण्यात आले. तसेच, या अधिवेशनाला उपस्थित माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारचे अक्षरशः वाभाडे काढत, या सरकारचा भामटेपणा व राज्य सरकारी कर्मचार्यांची सुरू असलेली फसवणूक उघडी पाडली. तसेच, महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास, सत्ता स्थापने नंतरच्या पहिल्याच कॅबिनेट (मंत्रीमंडळ) बैठकीमध्ये राज्य कर्मचार्यांना जुनी पेन्शन (ओपीएस) योजना जशाच्या तशी लागु करण्याचे वचन उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी याप्रसंगी दिले.
आपलं सरकार आणा, मी तुमची मागणी मान्य करतो. ही योजना मान्य केल्याचे कदाचित ते मान्य करतील. जे शिवसेना आईवर वार करु शकतात, ते तुमच्यावरही वार करु शकतात. जनतेची सत्ता सर्वात महत्वाची आहे. जनता हीच माझी ताकद आहे. हेच माझं सरकार आहे. राजकारण्यांना किती पेन्शन मिळते, त्यांना मिळणारी पेन्शन आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन यातील फरक तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सरकार चालवत आहात. आम्ही पदावर येतो, जातो. आम्ही कंत्राटी कामगार आहोत. दुर्देवाने कोरोना आला नाहीतर तुम्हाला इथे बसण्याची वेळच आली नसती, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.