मनोज कायंदे ४७०३ मताधिक्याने विजयी; डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा दारूण पराभव!
- सिंदखेडराजा मतदार संघाला मिळाले युवा नेतृत्व!
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज देवानंद कायंदे यांनी मावळते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा ४७०३ मतांनी पराभव केला आहे. वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर स्वार होऊन त्यांनी विजय प्राप्त केला आहे. डॉ. शिंगणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून ते जायंट किलर ठरले आहेत.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात असताना डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी विजय मिळविणे सोपे वाटत होते. परंतु, मराठा समाजाने डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पहिल्या फेरीपासून पसंती दिली. त्याचवेळी डॉ. शशिकांत खेडेकर आणि डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यात पहिल्या फेरीपासून काट्याची टक्कर होत असताना मनोज कायंदे तब्बल १५ हजार मतांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पेक्षा कमी मतांवर होते. परंतु, पाचव्या फेरीपासून मनोज कायंदे यांनी निर्यायक आघाडी घेत दुसर्या क्रमांकावर आले. डॉ.शशिकांत खेडेकर तिसर्या क्रमांकावर गेले. १५ व्या फेरीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मागे टाकीत मनोज कायंदे आघाडीवर आले. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, किनगावराजा, आडगावराजा, दुसरबीड, चांगेफळ, वर्दडी, जांभोरा, किनगावजट्टू या भागातील मतदारांनी मनोज कायंदे यांच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले आणि त्यांच्या विजय सोपा केला. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वडील सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर ते विजयी झाले होते. त्यानंतर डॉ. शशिकांत खेडेकर यांचे वडील जिल्हा सहकारी बँकेचे संचालक नरसिंहराव खेडेकर यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेवर ते निवडून आले. आणि सामाजिक कार्यकर्ते देवानंद कायंदे यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर मनोज कायंदे निवडून आले आहेत.
हा मतदार संघ भावनिक लवकर होतो. स्व. देवानंद कायंदे यांना खरी श्रध्दांजली अर्पण करायची असेल तर मनोज कायंदे यांना मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी प्रत्येक सभेत केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी हा एकमेव चेहरा संपूर्ण निवडणूकीची संपूर्ण धुरा सांभाळत असताना शिवसेना शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी संपलेली राष्ट्रवादी काँग्रेस काय लढत देणार! असा आरोप काझीवर केला होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याचे पत्रही सोशल मिडियावर टाकून डॉ. शशिकांत खेडेकर यांनी खळबळ उडवून दिली होती. परंतु, तेवढ्याच ताकदीने नाझेर काझी यांनी उत्तर दिले होते. खरंतर ही लढत जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझीविरोधात डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर हेच लढत आहे की काय असे वाटत होते. परंतु, नाझेर काझी हे शेवटपर्यंत मनोज कायंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि विजयी श्री खेचून आणली. या निवडणुकीत मनोज देवानंद कायंदे यांना ७२२५६, डॉ. शशिकांत खेडेकर यांना ५९८३८ तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ६७५५३ मते मिळाली. सविता मुंढे यांना १५००० मतांवर थांबावे लागले. मनोज कायंदे यांच्यामुळे या मतदारसंघाला युवा नेता मिळाला आहे, एवढे मात्र निश्चित.
‘फेक पत्रा’चा खोडसाळपणा अंगाशी येणार?; मनोज कायंदेंना सहानुभूतीची लाट!