नव्या सरकारचा उद्या शपथविधी; मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्याच गळ्यात?
- एकनाथ शिंदे, अजित पवार आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार!
– एक सीएम, दोन डेप्युटी सीएमचा फॉर्म्युला कायम राहणार असल्याची सूत्रांची माहिती
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यातील बहुमताने महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लवकरच या सरकारकडून सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे दाखल केला जाणार आहे. त्यानुसार, उद्या (दि.२५) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांबाबत अंतिम निर्णय होण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे आजच सायंकाळी नवी दिल्लीला रवाना होत आहेत. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, असे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलेले आहे. भाजपचे दिल्ली हायकमांड याबाबत आपला अंतिम निर्णय आज रात्रीच देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेवर आले असले तरी मुख्यमंत्रीपदाची घोषणा अद्याप झालेली नाही. दुसरीकडे, सत्ता स्थापनेचा दावादेखील अद्याप केला गेला नसला तरी, राज्यपाल भवनाकडून शपथविधीची तयारी चालू झाली होती. विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबररोजी संपुष्टात येत असल्याने उद्याच नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भाजप हायकमांडशी चर्चा करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आज सायंकाळी दिल्लीला रवाना होत आहेत. भाजप हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर केले जाणार असून, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेल, असे राजकीय सूत्रांचे मत आहे. तर ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला राज्यात कायम राहणार असून, याबाबतचा अंतिम निर्णय भाजप हायकमांड आज रात्री देणार आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असाही फॉर्म्युला पुढे आला असून, त्यानुसार भाजपला सर्वाधिक २२-२४, शिंदे गटाला १०-१२ व अजित पवार गटाला ८-१० मंत्रिपदे मिळू शकतात, असेही सूत्राने सांगितले.
या विधानसभा निवडणुकीत चमत्कारिकरित्या महायुती पुन्हा एकदा सत्तेवर आली असून, भाजपला सर्वाधिक १३२ जागा, शिंदे गटाला ५७ जागा तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळालेल्या आहेत. दुसरीकडे, सर्व महाआघाडी ४६ जागांत गुंडाळली गेली आहे. हा राजकीय चमत्कार कसा झाला, याबाबत महाराष्ट्र अद्यापही धक्क्यातून सावरलेला दिसत नाही.