DEULGAONRAJAHead linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजात ‘नवरा मेल्याचे दु:ख नाही, पण सवत रंडकी झाल्याचा आनंद’!

- निवडणूक निकालानंतर सिंदखेडराजा मतदारसंघात उलटसुलट चर्चेला उधाण!

– आ. मनोज कायंदेंकडून आता विकासाच्या अपेक्षा; साखरखेर्डा तालुकानिर्मितीचे वचन पूर्ण करावे लागणार!
– डॉ. शशिकांत खेडेकरांचे टायमिंग आणि रणनीती दोन्ही चुकले; तर डॉ. शिंगणेंना अतिआत्मविश्वास नडला!

साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक काल झाली. अपेक्षेप्रमाणे निकालही लागले. शिवसेना उमेदवाराच्या पराभवाचे दु:ख नाही, परंतु, डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाल्याचा आनंद साजरा करताना कार्यकर्ते दिसत आहेत. याचा अर्थ ‘नवरा मेल्याचे दु:ख नाही पण सवत रंडकी झाल्याचा आनंद होतो’ असा आहे. असे महाआघाडीचे पदाधिकारी खासगीत बोलताना दिसत आहेत. मनोज कायंदे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर आता साखरखेर्डा तालुका व इतर विकासाच्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वासही सर्वसामान्य माणसांत व्यक्त होत आहे. राजकीयस्तरावर मात्र महाआघाडीतच खमंग राजकीय चर्चा रंगताना दिसत आहेत.

May be an image of 8 people and textगेल्या ३० वर्षांपासून डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना पहिल्या १० वर्षांत सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्यावर जरी दिसला तरी त्यांची गाडी थांबत असे. त्यामुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळत गेली. नंतर लाल दिवा येताच सामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित झाला. कान भरणार्‍यांची संख्या वाढली. हळूहळू सामान्य कार्यकर्ता दूर गेला. त्यांना पर्याय उपलब्ध झाला तो डॉ.शशिकांत खेडेकर यांचा. खेडेकर यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. पहिल्याच निवडणुकीत ५० हजारांपेक्षा जास्त मते घेत शिवसेनेला बळ मिळाले. त्यानंतर २००९ साली पुन्हा निवडणूक लढविली, परंतु दारूण पराभव झाला. जातीय समीकरण जुळविण्यात ते कमी पडले. तसेच, ज्यांनी त्यांना निवडणुकीत साथ दिली होती, त्याच स्थानिक नेत्यांना टाळून त्यांनी स्वतःची राजकीय फळी उभी करण्याचा प्रयत्न केला, तो अनेकांना खटकला होता. २०१४ साली सर्व समिकरणे जुळवत त्यांनी बाजी मारली. मी नव्हतो म्हणून त्यांचा विजय झाला, असे कदाचित डॉ.राजेंद्र शिंगणे यांना वाटत असावे. तसेही त्यांनी अनेक भाषणातून नाव न घेता उल्लेख केला आहे. राजकारणात जो तो आपल्या परीने मतदान मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. डॉ.शशिकांत खेडेकर यांनी २० वर्षात जे केले ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामागे लोक आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु, प्रत्येकवेळी त्यांचा टाइमिंग चुकत गेला. अगदी मतदानाच्या पूर्वसंध्येला त्यांना पाठिंब्यासंदर्भात अजित पवार गटाचे एक बोगस पत्र व्हायरल झाले आणि मतदारसंघातील सर्व सहानुभूती मनोज कायंदे यांच्याकडे वळली. सिंदखेडराजा हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटलेला असताना, डॉ. खेडेकर यांनी हट्ट कायम ठेवीत लढेल तर शिवसेना पक्षावर असा आग्रह धरला. त्यासाठी ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, शिंदेंनीही त्यांचा हट्ट पुरवला. खेडेकरांनी धनुष्यबाण चिन्ह आणले, पण युती तोडीत. अजितदादा पवार यांनी आपला एबी फॉर्म अगोदरच जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्याजवळ देऊन ठेवला होता. त्यानुसार, मनोज कायंदे यांच्यासारखा तरूण काँग्रेस नेता एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणून त्यांना पक्षात प्रवेश दिला. एबी फॉर्मही दिला, आणि उमेदवारी अर्जही दाखल केला गेला. केवळ तीन तासांच्या वेळेत असे काही घडेल, हे डॉ.शशिकांत खेडेकर आणि डॉ.राजेंद्र शिंगणे यांनाही कळले नाही. May be an image of 9 peopleअर्ज दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात संपलेली आहे. शंभरसुध्दा कार्यकर्ते नाझेर काझी यांच्या पाठीशी नाही, असे उद्गार काढून महायुतीत मीठाचा खडा टाकला गेला. सापाच्या शेपटीवर पाय दिल्याने तो चवताळेलच! अशी अवस्था काझी यांची झाली. त्यांनी पायाला भिंगरी लावून त्याच जोषात पक्षाचे काम केले. तिसरी घोडचूक म्हणजे कोणत्याही वरिष्ठ नेत्याने पाठिंबा दिला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पाठिंबा असल्याचे खोटे पत्र प्रसार माध्यमांवर फिरवले गेले. त्याच ठिकाणी पाल चुकचुकली आणि मनोज कायंदे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला गेला. त्यात आपल्या जोशपूर्ण भाषणात डॉ.राजेंद्र शिंगणे यांनीसुद्धा नाझेर काझींवर शाब्दिक शेरोशायरी करीत, हात धुवून घेतला. त्याचा परिणाम सिंदखेडराजा शहरात डॉ.राजेंद्र शिंगणे यांना मतदारांनी हात दाखवून दिला. साखरखेर्डा तालुका निर्मिती, सुतगिरणी असे कितीतरी विषय डॉ.शिंगणे यांच्यासाठी अडचणीचे ठरले, आणि त्यांच्या मतात प्रचंड घसरण झाली.


या निवडणुकीत मनोज कायंदे यांना ७३ हजार ४१३, डॉ. शशिकांत खेडेकर यांना ६० हजार ६३५, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ६८ हजार ७६३, दत्तात्रय काकडे यांना २५०९, दत्ता चव्हाण यांना ३५३५, सविताताई मुंढे यांना १६ हजार ६५८, डॉ.सुरेश घुमटकर यांना ३७०, अ.हफीज अ. अजीस ११४, कुरेशी जुनेद २८८, कुमारी गायत्री शिंगणे यांना फक्त ५५८, बाबासाहेब म्हस्के १४४, भागवत राठोड यांना १९९, रामदास कहाळे यांना ३३२, विजय गवई यांना ५८३, सुधाकर काळे यांना २८६, सुनील जाधव ७०३, सै. मोबीन सैय्यद नईम ६३९ Dााणि नोटा ७४२ अशी मते मतदारांनी दिली आहेत. विशेष म्हणजे, पोस्टल मतदानातही सात सुशिक्षित मतदारांनी नोटाला पसंती देत आपला मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!