पराभवाच्या भीतीने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली; म्हणून बदनामीचे षडयंत्र सुरू : डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर!
- मतदारच त्यांना धूळ चारतील, फार काळ असले षडयंत्र यशस्वी होत नसतात!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – या निवडणुकीत विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागला असून, त्यामुळेच आमच्या कुटुंबात नाक खुपसून विरोधक नीच प्रकारचे राजकरण करत आहेत. मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेवर चालणार्या लोकनेतृत्वाची पत्नी असून, जातीपातीच्या भिंती आम्ही स्वकर्तृत्वाने उद्धवस्त केल्या आहेत. पायाखालची वाळू सरकली म्हणूनच विरोधक बदनामीचे षडयंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी करत, विरोधकांच्या षडयंत्रांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांना लोकांसमोर सांगण्यासारखे काहीही उरलेले नाही. गेल्या तीस वर्षांच्या काळात मेहकर, लोणार तालुक्यांचा विकास करता आला नाही. त्यामुळे विरोधी उमेदवाराच्या कुटुंबात हस्तक्षेप करून नीच प्रकारचे राजकारण विरोधक करत आहेत. हे विरोधक प्रचंड घाबरले आहेत, त्यांना आपला पराभव दिसू लागला आहे, अशा शब्दांत डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी विरोधकांना सुनावले. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करण्याची आमची संस्कृती व संस्कार नाहीत. नाही तर एकच सांगते, ‘जिनके घर काँच से बने होते हैं, वो दूसरों को पत्थर नहीं मारा करते’, आम्ही या पातळीवर उतरलो तर पळताभुई थोडी होईल, असा इशाराही डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ.ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांचा आंतरजातीय विवाह झालेला असल्याने, त्यांच्या या विवाहाला त्यांच्या सासूबाई, आणि पतीचे मामा गजानन सातपुते यांचा विरोध आहे. परंतु, डॉ. ऋतुजाताई यांचे पती ऋषांक चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज यांच्या विचारधारेला मानणारे असल्याने व दोघेही उच्चशिक्षित असल्याने त्यांनी आपला विवाह परिवाराच्या विरोधात जाऊन केला आहे. त्यामुळे त्यांचे मामा यांनी उमेदवारांच्या सासूबाई यांना शिंदे गटामध्ये नेवून सत्कार केला. प्रस्थापित पक्षाच्या पायाखालची जमीन पराभवाच्या भीतीने सध्या खदाखदा हालत आहे. त्यामुळे उमेदवारला त्रास देण्यासाठी अशा नीच प्रकारचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे डॉक्टर ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी मतदार मायबाप जनतेस आव्हान केले आहे की, कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. ही निवडणूक मी जिंकण्यासाठी लढत आहे. त्यामुळे कोणी कितीही अपप्रचार केला तरी, मी प्रामाणिकपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून, ही निवडणूक मतदारांच्या आशीर्वादाने जिंकून निवडून येणारच आहे. या विजयानंतर माझी विकासकामे हेच मतदारांना चोख प्रत्युत्तर असेल, असेही त्यांनी सुनावले आहे.
——-