– वंचित बहुजन आघाडीची दारेदेखील खुली!
चिखली (तालुका प्रतिनिधी) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीकडून जागा देण्याचे निश्चित असतांना शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी कडाडून विरोध केल्याने, तुपकरांची बुलढाण्यातून महाआघाडीची उमेदवारी बारगळली आहे. असे असतानाही त्यांच्यावर निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्ते यांचा दबाव वाढलेला आहे. तर त्यांचे खंदे समर्थक व शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी चिखलीतून लढावे, यासाठी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दबाव निर्माण केला असून, सरनाईक हे जर चिखलीच्या मैदानात उतरले तर मात्र तिहेरी लढतीचे संकेत आहेत. सरनाईक यांना फक्त तुपकरांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेतेदेखील त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे.
शेतकरी नेते विनायक सरनाईक हे चिखली तालुक्यातील शेतकरी चळवळीचा आक्रमक चेहरा आहेत. शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी कधी संवाद तर कधी संघर्षातून न्याय देण्याचे काम विनायक सरनाईक, नितीन राजपूत ही जोडगोळी गेल्या १५ वर्षांपासून करत असून, ते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासोबत शेतकरी चळवळीत सक्रीय आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष किंवा वंचित आघाडीकडून लढावे, यासाठी शेतकरी चळवळीतून मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला जात आहे. तथापि, ते रविकांत तुपकरांच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. त्यांना रविकांत तुपकरांची साथ मिळाल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत बघावयास मिळू शकते. विशेष म्हणजे, सरनाईक यांनी नामांकन अर्ज घेतला असून, ते तुपकरांच्या भूमिकेकडे डोळे लावून असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. नुकतेच त्यांनी केलेल्या उपोषणामुळे शेतकर्यांना पीकविमा मिळू शकला, तसेच भक्ती महामार्गदेखील सरकारला रद्द करावा लागला होता. दुसरीकडे, तुपकरांनी बुलढाण्यात बैठक घेतल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून बुलढाणा लढण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते यांना होती. तर तुपकरांनी चार पर्याय बैठकीत ठेवले होते. त्यातील महाविकास आघाडी व महायुती पर्याय संपुष्टात आला असल्याने तुपकरांसमोर चिखलीत उमेदवार अपक्ष लढवणे, किंवा वंचित आघाडीची साथ घेणे यावर निर्णय येवून ठेपला आहे. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासारखा लढवय्या नेता, या मतदारसंघात मैदानात उतरला तर मात्र येथील लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तुपकरांना चांगला लीड मिळालेला आहे.
—————